सातारा प्रतिनिधी । लोकसभेला माढ्यात भाजप उमेदवाराचा पराभव हा फलटण, करमाळा, सांगोला माढा आदी मतदारसंघात राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळला न गेल्यामुळेच झाला आहे. यामुळे आगामी विधानसभेला आम्ही महायुतीचे काम करणार नाही, असा पवित्रा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.
सातारा येथे पश्चिम संघटन महामंत्री मकरंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या उपस्थितीत नुकतीच एक जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी माजी आ. मदन भोसले, मनोज घोरपडे, बजरंग गावडे, अमोल असते, शहराध्यक्ष अनुप शहा, विश्वासराव भोसले, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, संजय गायकवाड, संदीप चोरमले, सोपानराव जाधव उपस्थित होते.
यावेळी जयकुमार शिंदे म्हणाले, माढ्यात राष्ट्रवादीने खासदार रणजितसिह नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात काम केल्यामुळेच त्यांचा पराभव झाला. भाजपने मोहिते-पाटील यांना आमदार केलं, त्यांच्या बंद कारखान्याला मदत केली. परंतु, त्यांनी मात्र घराला प्राधान्य दिले व पक्षहित महत्त्वाचे मानले नाही. त्यांनी उघडपणे भाजपच्या विरोधात प्रचार केला. त्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कार्यकर्त्यावर पक्षशिस्तीची कारवाई होऊन आमदारकी रद्द करावी. अन्यथा सर्वसामान्य भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल
तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट, माढा मतदारसंघातील महायुतीचे घटक पक्षातील राष्ट्रवादीने संपूर्ण मतदारसंघांमध्ये विरोधात काम केले आहे. करमाळा, माढा, सांगोलाचे या मतदार संघांमधील नेते आमदार बबन शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे यांनी उघडपणे तडजोडी केलेल्या आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघांमध्ये तुतारीला लीड मिळाले आहे.
फलटण तालुक्यातही आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर व त्यांचे कुटुंबीय व सर्व पदाधिकारी यांनी उघडपणे सभा घेऊन महायुतीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने दखल घेऊन शिस्तभंगाची कारवाई करावी. त्यांच्या कार्यकर्त्यांची महामंडळावर तसेच शासकीय समित्यांवर वर्णी लावू नये, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी अनुप शहा, सोपानराव जाधव, विश्वासराव भोसले यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी प्रिया शिंदे, विठ्ठल बलशेठवार, संतोष कणसे, सागर शिवदास, रणजीत जाधव, विशाल नलवडे व जिल्हातील भाजप पदाधिकारी उपस्थित होते.