सातारा प्रतिनिधी । जावळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. मात्र, दरवेळी कोणतीही निवडणूक लागली की काहींना निवडणूक लादण्याची हौस येते. आता प्रत्येक निवडणुकीत मतदार त्यांना मताच्या रूपात त्यांची जागा दाखवून देत आहेत. त्यामुळे अशा विरोधकांचा विषय आता तालुक्यातून संपल्यात जमा आहे, असे प्रतिपादन भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. त्यांनी केलेल्या विधानाची सध्या चांगलीच चर्चा तालुक्यात होत आहे.
जावळी- महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक साधारण सभा कुडाळ, ता. जावळी येथे नुकतीच पार पडली. यावेळी माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगडचे अध्यक्ष सौरभ शिंदे, माजी शिक्षण सभापती अमित कदम, राजेंद्र राजपुरे, ज्ञानदेव रांजणे, सभापती जयदीप शिंदे, उपसभापती हेमंत शिंदे यांच्यासह सर्व संचालक, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले कि, महू, हातगेघर धरणाचे काम पूर्ण होऊन लवकरात लवकर शिवारात पाणी यावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्याप्रमाणे बोंडारवाडीचे काम मार्गी लावले तसेच महू, हातगेघर धरणाचे देखील काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने लवकरच मार्गी लागेल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.