…तोपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढणार नाही; आ. जयकुमार गोरेंची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. अशा परिस्थितीत आता भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी थेट विधानसभा निवडणूक न लढवण्याबाबत महत्वाचे विधान केले आहे. “माण-खटावच्या मातीला दुष्काळमुक्त करायचे आहे. हेच स्वप्न घेऊन मी मतदारसंघात आलो. आज उरमोडी योजनेतून ९५ गावांना पाणी जातेय. उत्तर माणमधील १६ गावांचे जिहे-कठापूरमधून काम सुरू आहे. कुकुडवाडसह ४४ गावांसाठी लवकरच सुप्रमा घेऊन त्याही गावांचा पाणी प्रश्न सोडवतोय. या २१ गावांचे काम चालू केल्याशिवाय येणारी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणाच आ. गोरे यांनी केली आहे.

बिजवडी येथे उत्तर माणमधील २१ गावांना जिहे-कठापूरचे पाणी मंजूर केल्याबद्दल कृतज्ञता सोहळा घेण्यात आला. यावेळी अरुण गोरे, अर्जुन काळे, दादासो काळे, हरिभाऊ जगदाळे, बाबासो हुलगे, सोमनाथ भोसले, संजय गांधी, अतुल जाधव, सिद्धार्थ गुंडगे, अक्षय महाराज भोसले, मामूशेठ वीरकर, तुकाराम भोसले, विठ्ठलराव भोसले, नवनाथ शिंगाडे, संजय भोसले, राजाराम बोराटे, दौलतराव जाधव, एकनाथ कदम, आदी उत्तर माण सर्व गावांतील प्रमुख, ग्रामस्थ तसेच माण तालुक्यातील विविध गावचे मान्यवर उपस्थित होते.

आ. गोरे म्हणाले, ‘‘२०१९ मध्‍ये आंधळी धरणातून उचलून या भागाला पाणी देणार, हा शब्द दिला होता. या योजनेचे भूमिपूजन करून कामही सुरू करून दाखवले आहे. ही योजना अंदाजे साडेपाचशे ते पावणेसहाशे कोटी रुपयांची आहे. २४ तास लबाडाच्या संगतीत राहणाऱ्यांना लबाडीच दिसणार, असा टोलाही त्यांनी विरोधकांना दिला.