सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीवरून अनेक घडामोडींना वेग आला आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस भवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेत महायुती विरुद्ध व्यूहरचना आखली. त्यानंतर आता महायुतीतील भाजप पक्षाच्या एका नेत्याने भाजप आपला उमेदवार उभा करून सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवणार असल्याचं सांगून टाकलं आहे. भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी केलेल्या या विधानामुळे साताऱ्यात महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. जागेवरून सध्या महायुतीत वाद पेटला आहे हे नक्की!
सातारा लोकसभा मतदार संघात सर्व प्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1 डिसेंबर रोजी कर्जत येथे झालेल्या मेळाव्यात सातारासह तीन महत्वाच्या मतदार संघात आपल्या गटाचे उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या विधानानंतर महायुतीत सहभागी झालेले भाजप आणि शिंदे गटातील नेत्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या विधानाबाबत सावध प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या.
मात्र, आता सातारा लोकसभा मतदार संघात आपला उमेदवार उभा करण्याबाबत भाजपनेही निश्चित केल्याचे दिसत आहे. त्यामुळे महायुतीतील हा जागा वाटपाचा पेच निर्माण होणार आहे.
जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले?
भाजपानं गेल्या साडे तीन वर्षात या मतदासंघात मोठ्या ताकदीनं काम केल आहे. तसंच भाजप हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. यामुळं कोणी काहीही भूमिका मांडत असेल तरी हा मतदारसंघ कोणत्याही किमतीवर भाजपाकडंच राहिला पाहिजे, अशी भूमिका पक्ष श्रेष्ठींकडे मांडली आहे. आम्ही हा मतदारसंघ कोणत्याच परिस्थितीत सोडणार नसल्याचं सांगून जयकुमार गोरे यांनी थेट अजित पवारांना थेट आव्हान दिले आहे.
सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला…
सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. २००९ ला पुरुषोत्तम जाधव हे उमेदवार होते. त्यानंतर २०१४ हा मतदारसंघ आरपीआयला सोडण्यात आला. २०१९ च्या लोकसभेला हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे आला, निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शिवसेनेत आलेल्या नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, नरेंद्र पाटील २०१९ ला पराभूत झाले.
सातारा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे जाणार हे निश्चित…
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर उदयनराजे भोसले निवडणूक जिंकले होते. मात्र, सहा महिन्यात राजीनामा देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यांनी पोटनिवडणूक लढवली पण त्यांना अपयश आलं आणि श्रीनिवास पाटील विजयी झाले होते. आता हा मतदारसंघ महायुतीत कुणाकडे जाणार हे स्पष्ट झालेलं नाही. पण, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे जाणार हे निश्चित आहे.