…तर मी निवडणूकच लढणार नाही; BJP आमदार जयकुमार गोरेंची भर कार्यक्रमातच घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुक लढवण्यापासून ते उमेदवार उभा करण्यावरून महाविकास आघाडी व युती सरकारमधील नेत्याकडून घोषणा केल्या जात आहेत. अशीच एक महत्वाची घोषणा माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी नुकतीच केली होती. त्यानंतर आता त्यांनी एका कार्यक्रमात अजून एक घोषणा केली आहे. जोपर्यंत जिहे-कठापूरचे पाणी हिंगणीत सुटत नाही, टेंभूच्या योजनेचे भूमिपूजन करत नाही तोपर्यंत आपण निवडणूक लढणार नाही, असे जयकुमार गोरे यांनी जाहीर कार्यक्रमात म्हंटले आहे.

बिजवडी येथे आ. जयकुमार गोरे यांच्या उपस्थित एक कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माण-खटावमधील ४४ गावांसाठी टेंभू प्रकल्पांतर्गत अडीच टीएमसी, तर माणच्या उत्तरेकडील २१ गावांसाठी जिहे-कठापूरचे दीड टीएमसी पाणी फेरवाटपामुळे आरक्षित झाले. त्यासाठी निधीही मंजूर झाला. जिहे- कठापूर योजनेचे भूमिपूजन करून पाइपलाइनचे काम सुरू आहे, तर नुकतेच ४४ गावांच्या सिंचनासाठी ६८४ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. एका महिन्यात टेंडर निघून या योजनेचे लवकरच भूमिपूजन होईल.

जोपर्यंत जिहे- कठापूरचे पाणी हिंगणीत सुटत नाही, टेंभूच्या योजनेचे भूमिपूजन करत नाही, तोपर्यंत आपण निवडणूक लढणार नाही हा माझा शब्द आहे. टेंभू योजनेच्या अंतर्गत दुष्काळग्रस्त भागाला भरघोस निधी आ. जयकुमार गोरे यांच्या पाठपराव्यामुळे मिळाला आहे. आता या भागात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत.