सातारा प्रतिनिधी । मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशनापूर्वी काल राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक घेतली. या बैठकीत मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर भाजप आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी फेसबुक पोस्ट करत सरकारचे आभार मानले आहेत. त्याची हि फेसबूक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
आमदार गोरे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट (Facebook Post) मध्ये म्हंटले आहे की, गेल्या ४० वर्षांपासून सुरू असलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे. गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला यश मिळाले. राज्यातील ‘महायुती सरकार’च्या माध्यमातून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याबाबत ऐतिहासिक विधेयकाला राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठ्यांना देण्याची भूमिका २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली होती. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनीही मराठा समाजासाठी सकारात्मक भूमिका घेतली.
मराठा समाजाची आरक्षणाची मागणी सर्व प्रथम स्व. अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार नेते यांनी १९८० मध्ये केली व मराठा समाजामध्ये जागृती करून पहीला मराठा आरक्षणा संदर्भात दि.२२ मार्च १९८२ रोजी मुंबईत काढला होता. तेव्हापासून मराठा आंदोलक श्री. मनोज जरांगे-पाटील यांच्यापर्यंत ज्या-ज्या मराठा समाजबांधवांनी आंदोलनात योगदान दिले त्या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी लागेल. तसेच, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या सर्व मराठा योद्धांना हे आरक्षण समर्पित करतो. सर्व मराठा बांधव, आंदोलक आणि यांचे अभिनंदन करतो. मराठा आरक्षणासाठी सकारात्मक भूमिका घेणाऱ्या ‘महायुती’ सरकारचे जाहीर आभार!, असे आमदार गोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे.