कराड प्रतिनिधी । आज संपुर्ण राज्यभरात भाजप पदाधिकाऱ्यांकडून संदेशखालीतल्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. याला पाठिंबा म्हणून आज कराड भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने येथील कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधी यांच्या पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पश्चिम बंगालची भूमी महिलांसाठी चालता-बोलता नरक बनलीय. या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जींसारखी खुद्द एक महिला असतानाही इथल्या महिलांची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान दिवसाढवळ्या पायदळी तुडवला जात आहे. या महिलांवरील अत्याचारांची निःष्पक्षपणे व तातडीने चौकशीने करून अन्यायग्रस्तांना न्याय द्यायला हवा, अशी मागणी केली तसेच पूजा चव्हाण प्रकरणातील मंत्री संजय राठोड यांना उध्दव ठाकरेंनी दिलेल्या क्लिनचीट मुळेच मंत्रिपद मिळाले असल्याचा आरोप वाघ यांनी केला.
कराड येथील कोल्हापूर नाक्यावर आज भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनास चित्रा वाघ यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, पूजा चव्हाण प्रकरणातील मंत्री संजय राठोड यांना ज्या काही गोष्टी मिळत आहेत. त्या केवळ उद्धव ठाकरेंमुळे मिळतात. राठाेड यांना मिळालेले मंत्रीपद किंवा आगामी लोकसभा तिकिट हे उध्दव ठाकरेंनी दिलेल्या क्लिनचीट मुळेच मिळत आहे, असा आरोप वाघ यांनी यावेळी केला.
दरम्यान, कराड येथील कोल्हापूर नाका येथे करण्यात आलेल्या भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.