सातारा प्रतिनिधी | अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य या मूलभूत हक्कांच्या आडून शिवछत्रपतींचा अवमान केला आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्र पेटून उठला आहे. सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपा सांस्कृतिक आघाडीच्यावतीने सातारा शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे. यावेळी प्रितम कळसकर, नाना भोसले, राहुल गायकवाड, सुनीशा शहा व शिवप्रेमी उपस्थित होते.
भाजप सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अभिनेता राहूल सोलापूरकर, यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. राहुल सोलापूरकर यांनी नुकतेच शिवाजी महाराज यांची आग्रा येथून सुटका होण्याच्या प्रसंगी आपली अक्कल पाजळवली आहे. शिवरायांच्या पराक्रमाचा हा अवमान आहे. यामुळे समाजात अशांतता आणि तेढ निर्माण होवू शकणार्या वक्तव्याने उभा महाराष्ट्र पेटून उठला आहे.
अशा प्रवृत्तींमुळे जातीय आणि धार्मिक ताणतणाव निर्माण होत आहे, हे अतिशय संतापजनक आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी राहुल सोलापूरकर यांच्यावर कायद्यातील कठोर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.




