कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
पतंग उडवण्यासाठी नायलॉनच्या मांजाचा वापर केला जात असल्याने पक्ष्यांबरोबरच मानवी जीवनावरदेखील यामुळे संक्रांत येत आहे. पतंग काटाकाटीच्या खेळात दरवर्षी शेकडो पक्षी बळी पडत आहेत. अशीच एक घटना आज कराड शहरातील मध्यवस्तीत घडली. एक घार पंखात मांजा अडकल्यामुळे खाली पडलीहोती. त्या घारीची पक्षी मित्र अजय महाडिक मांजा कापून मुक्तता केली. मात्र, कराड शहरात अशा नायलॉनच्या मांजावर बंदी घालण्याबाबत ना पालिका ना पोलीस प्रशासनाकडून पुढाकार घेतला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरात शुक्रवार पेठेत नर्सिंग होम च्या पाठीमागील बाजूस सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक घार जखमी अवस्थेत पडली होती. हि गोष्ट नितीन वास्के यांच्या लक्षात आली. त्यानंतर वास्के यांनी पक्षी मित्र अजय महाडिक यांना फोन करून घारींबाबत माहिती दिली. त्यानंतर महाडिक यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनी जमिनीवर पडलेल्या घारीला उचलले. नायलॉनच्या मांजर अडकलेल्या पंखाची सुटका केली.
मांजातून घारीची सुटका करत असताना तिच्या पंखांना दुखापत झाल्याचे दिसून आले. यावेळी अगदी नाजूकपणे कोणतीही इजा होऊ न देता महाडिक यांनी मांजातून पंखांची सुटका केली. त्यानंतर त्या जखमी आणि अशक्त पडलेल्या घारीला आपल्या घर घेऊन गेले. तिला पाणी ग्लुकोजचे पाजले. थोड्या वेळानंतर जखमी आणि अशक्त पड्लेवली घार मूळ स्थितीत आलाय. त्यानंतर महाडिक यांनी त्या घारीला डॉक्टरांकडे घेऊन जात तिच्यावर उपचार केले. डॉक्टरांनी घारीवर उपचार केल्यानंतर वनविभागाचे अधिकारी कैलास सानप यांच्याकडे सुपूर्द केले.
नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी मात्र, अंमलबजावणी नाही
नायलॉन मांजाचे दुष्परिणाम लक्षात घेता दिल्लीत या मांजावर बंदी घालण्यात आली आहे. पाठोपाठ महाराष्ट्रात देखील याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अशातही सर्रासपणे या मांजाची विक्री केली जात असल्याने, मकरसंक्रांत या गोडवा निर्माण करणाऱ्या सणाला काहीसे कडवट रूप प्राप्त होत आहे. नायलॉन मांजामुळे आतापर्यंत शेकडो पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. नायलॉन मांजा या पक्ष्यांच्या जीवावर उठत आहे. हा मांजा कुजत किंवा नष्ट होत नसल्याने, वर्षानुवर्षे या मांजाचे दुष्परिणाम पक्ष्यांना भोगावे लागत आहेत.
नायलॉनचा मांजा विकणाऱ्यावर कारवाई व्हावी : पक्षीमित्र अजय महाडिक
कराड शहरात आज नायलॉन मांजामुळे जखमी पडलेल्या घारीला जीवदान दिलेल्या पक्षीमित्र अजय महाडिक यांच्याशी ‘हॅलो महाराष्ट्र’ने संवाद साधला. यावेळी महाडिक यांनी केवळ पक्षीच नाहीत तर मानवी जीवनासाठीदेखील हा नायलॉन मांजा घातक ठरत आहे. या मांजामुळे आतापर्यंत अनेकांना दुखापत झाली आहे. मांजामुळे अनेक बाहेरून येणाऱ्या पक्षांना इजा पोचत आहे. त्यांचे पंख छाटल्यानंतर त्यांना परत आपण ज्या ठिकाणावरून आलोय त्या ठिकाणी जाता येत नाही त्यांना अपंगत्व येते. या सर्व बाबी लक्षात घेता, मांजा विक्री करणाऱ्या आणि वापरणाऱ्यावर कारवाई करणे गरजेची असल्याकजी प्रतिक्रिया पक्षीमित्र अजय महाडिकी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
‘या’ पक्ष्यांवर ‘संक्रांत’…
शराटी, घुबड, पांढऱ्या माणेचा करकोचा, राखाडी छातीची पाणकोंबडी, ग्रेट थिकणी, शिक्रा, चिमणी, कबुतर, पोपट, कावळे, साळुंकी, घार आदी पक्षी नायलॉन मांजाच्या जाळ्यात अडकून बळी पडतात.
एक वर्षाची शिक्षा…
नायलॉन मांजा, काचेचा मांजा साठा व विक्री करण्यास बंदी असून, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७/१/अ अन्वये शिक्षेची तरतूद आहे. कमीत कमी चार महिने आणि जास्तीत जास्त एक वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते.
पंख छाटले गेल्याने उडणे होते कायमचे बंद…
मांजामुळे फुलपाखरे, सरडे, खार यांनाही जीव गमवावा लागतो. उपचारासाठी जे पक्षी आणले जातात, त्यांच्यापैकी ६० टक्के पक्षी पुन्हा चांगले होतात; परंतु उर्वरित पक्ष्यांना गंभीर इजा झाल्यामुळे जीव गमवावा लागतो. मांजामुळे ज्या पक्ष्यांचे पंख छाटले जातात, त्यांचे उडणे कायमचे बंद होते आणि ते काही दिवसांतच कुणा अन्य प्राण्यांचे भक्ष्य ठरतात.
कारवाई करायची कोणी?
न्यायालयाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर व पतंगासाठी वापरावर बंदी घातली असली तरी विक्री करणाऱ्यांवर कारवाई कोण करणार, हा प्रश्न आहे. अशा मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून व पक्षी मित्रांमधून केली जाते. मात्र, कारवाईची जबाबदारी कोणीच स्वीकारत नाही. ना पालिका ना पोलिस प्रशासन या दोन्ही कडून कारवाई केली जात नाही.
घारीबद्दल थोडक्यात
घार हा फॅल्कॉनिफॉर्मिस पक्षिगणातील ॲक्सिपिट्रीडी कुलातील एक पक्षी आहे. गरुड, ससाणा व गिधाडे हे पक्षीही याच कुलातील आहेत. याचे शास्त्रीय नाव मिल्व्हस मायग्रान्स आहे. हा पक्षी भारतात सगळीकडे आढळतो. हिमालयातही तो समुद्रसपाटीपासून सु. २,५०० मी. उंचीपर्यंत आढळतो. नेपाळ, बांगला देश, पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार या देशांतही हा पक्षी आढळतो. घार हा पक्षी आकाराने गिधाडापेक्षा काहीसा लहान असून त्याची लांबी ५० – ६० सेंमी. असते. रंग तपकिरी असतो. डोके बसके, चोच आकडीसारखी आणि काळी असते. चोचीच्या बुडाकडील मांसल भाग पिवळसर; डोळे तपकिरी; पाय आखूड व पिवळे असून त्यांवर तपकिरी पिसे असतात. नख्या तीक्ष्ण व काळ्या, पंख लांब व टोकदार आणि शेपूट लांब व दुभागलेले असते. आकाशात उडताना दुभागलेल्या शेपटीमुळे हा पक्षी इतर पक्ष्यांपासून ओळखता येतो. घार एकटी व चार-पाचच्या गटात भटकत असते.
मांजामुळे पक्ष्यांच्या जीवावर होणारे परिणाम
- नायलॉन आणि चायनीज मांजामुळे पक्ष्यांचा जीव जातो.
- पक्ष्यांना कायमच अपंगत्व येते.
- अनेक पक्षी गंभीर जखमी होतात.
- काही पक्ष्यांचा जीव गेला आहे.
- फास लागलेल्या पक्ष्यांमध्ये सर्वाधिक कबुतरे, त्या पाठोपाठ कावळ्यांची संख्या आहे.