कराड प्रतिनिधी | उंडाळेसह परिसरात मादी बिबट्या व तिच्या दोन पिल्लांनी – धुमाकूळ घातला आहे. उंडाळे तुळसण रस्त्यावर शनिवारी दिवसभरात दहा ते पंधरा दुचाकीस्वारांचा बिबट्याने पाठलाग केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उंडाळे व तूळसण फाटा दरम्यान निगडीचा ओढा म्हणून प्रसिद्ध असलेल्या परिसरात शनिवारी दिवसभरात बिबट्या व तिच्या दोन पिल्लांनी शनिवारी दिवसभरात अनेकदा तुळसण-उंडाळे प्रवास करणाऱ्यांना दुचाकी, चारचाकी वाहन धारकांना सातत्याने दर्शन दिले. त्यातच बिबट्या मादीने व तिच्या दोन पिल्लांनी तुळसण- उंडाळे वाहतूक करणाऱ्या दहा ते वीस दुचाकीस्वरांचा पाठलाग केला.
याबाबतचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून बिबट्याची मादी प्रचंड वेगाने उसाच्या शेतातून धावत बाहेर येत दुचाकी व चारचाकी वाहनांचा पाठलाग करत असल्याचे कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांची भीतीने घाबरगुंडी उडाली. अनेक दुचाकीस्वारांचा चांगलीच तारांबळ उडाली. ठराविक अंतरात दुचाकी आल्यानंतर बिबट्या उसाच्या शेतातून बाहेर येत दुचाकीचा जोरदार पाठलाग करत होता.
परंतु बिबट्याच्या अचानक झालेल्या पाठलागामुळे दुचाकीस्वरांचा वाहनावरील तोल ढळत होता. त्यामुळे दुचाकीस्वार गाडी वेगाने पळवत होते. सदर बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी विभागातून होत आहे. दरम्यान, सध्या विभागात खरीप हंगामाची काढणीची धांदल सुरू असून परिसरातील शेतकरी व महिला शेतात जाण्यास घाबरत असल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत.