कराड प्रतिनिधी । बिबट्याने दुचाकीवर झेप घेतल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना मलकापूर-जखिणवाडी मार्गावर भोसले इंडस्ट्रीजजवळ मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. बिबट्याने रस्ता ओलांडताना दुचाकी समोर आली की दुचाकीवर हल्ला केला. याबाबत वनविभागाकडून शोध घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विक्रम लक्ष्मण जाधव हे मुलांना घेऊन जखिणवाडीला जात होते. भोसले इंडस्ट्रीजच्या पुढच्या बाजूला असणाऱ्या उसाच्या शेतीतून अचानक बिबट्या बाहेर पडला. याचवेळी जाधव यांची दुचाकी तिथे गेल्याने बिबट्याने त्यांच्या अंगावर झेप घेतली. विक्रम जाधव यांच्या मांडीला बिबट्याची नखे लागल्याने विक्रम जाधव हे जखमी झाले आहेत.
घटनेनंतर बिबट्याने तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड वनविभागाचे वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांच्या आदेशाने वनपाल आनंदा जगताप, कैलास सानप यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.