कराड प्रतिनिधी । कराड ते विटा मार्गावर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासमोर एका अज्ञात ट्रकचालकाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून ट्रकचालक पसार झाल्याची घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
भीमराव तुकाराम भोसले (औध. ता. खटाव जिल्हा सातारा) असे अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, कराड ते विटा मार्गावर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयासमोर कृष्णा नाका दिशेने एक दुचाकीस्वार ( क्रमांक एमएच ४२ एटी ७४३६) जात होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागून ट्रक क्रमांक (एमएच ११ ए जी १००८) मधून ट्रकचालक येत होता. यावेळी ट्रकचालकाने उपजिल्हा रुग्णालय समोरील सिग्नल क्रॉस केल्यानंतर समोरील दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली.
ट्रकने धडक देताच दुचाकीस्वार ट्रकच्या मागील चाकाच्या खाली आला. दुचाकीस्वार हा जागीच कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, घटना घडल्यानंतर ट्रकचालकाने ट्रक जागेवरच सोडून पलायन केले. तर गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारास नागरिकांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी काहीवेळानंतर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला आहे.
ट्रकच्या अपघातानंतर वाहतूक कोंडी
कराड येथील उपजिल्हा रुग्णालय समोर ट्रक आणि दुचाकींचा अपघात झाल्यानंतर घटनस्थाळावरून ट्रकचालक तर्क तसाच सोडून पसार झाला. त्यामुळे तर्क हा सुमारे एक तासतसाच रस्त्यावर उभा होता. यावेळी या ठिकाणहून जाणार्या वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.