कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेचे पाच उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, सातारा लोकसभेसाठी अद्याप कोणताही उमेदवार देण्यात आला नसून ही जागा काँग्रेसकडे जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशा परिस्थितीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत महत्वाचे विधान केले आहे. “उमेदवार कोण असेल हा निर्णय शरद पवार यांनी घ्यायचा आहे. शरद पवारांनी आदेश दिला तर मी लढायला तयार आहे” असे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हंटले आहे.
माजी मुख्यमंत्री आ. चव्हाण यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने मागे उभे राहू. सातारा लोकसभा काँग्रेसने लढवावी म्हणून प्रस्ताव अजून आला नाही जर आला तर त्या प्रस्तावाचा विचार करू.”
“हा मतदासंघ राष्ट्रवादीकडे गेला आहे. 48 पैकी जवळजवळ सर्व जागांवर एकमत झालं आहे. सातारा मतदार संघात उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा सुरू आहे, मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच आहे ” असे मत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.