2024 मध्ये BJP चा जिल्ह्याचा लोकसभा, विधानसभेचा उमेदवार कोण असणार? फडणवीसांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
सातारा जिल्ह्यात भाजपने अनेक विकास कामे केली आहेत. सातारा जिल्ह्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आजच्या महाजनसंपर्क अभियान, मेळाव्यातून भाजपने सुरुवातच केल्यासारखे झाले आहे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मेळाव्यात आगामी 2024 चा लोकसभा आणि कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचा भाजपचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे कराड दक्षिण मतदार संघात सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी फिक्स झाल्याचे आजच्या मेळाव्यात स्पष्ट दिसत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कराडला आज भाजपा महाजनसंपर्क अभियान अंतर्गत भव्य लाभार्थी संमेलन व जाहीर सभा पार पडली. या मेळाव्यासाठी भाजप आमदार प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर, उदयनराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, शिवेंद्रसिहराजे भोसले, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, डॉ. सुरेश भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, विक्रम पावसकर आदी मान्यवर उपस्थित आहेत.

यावेळी फडणवीस म्हणाले, सातारा जिल्ह्यात मी 5 वर्षे मुख्यमंत्री होतो. या पाच वर्षात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आपण 58 टीसीएम पाण्याचा जल साठा याठिकाणी निर्मित केला. या सातारला जिल्ह्यात त्या काळात 48 हजार सिंचन विहिरी आपण तयार केल्या. 2014 ते 2019 या 5 वर्षात सातारा जिल्ह्यात 48 हजार हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता तयार करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून झाले आहे.

खा. उदयनराजे भोसले म्हणाले, मी आज वस्तुस्थिती मांडणार 40-45 वर्षे काँग्रेसचे राज्य होतें. केंद्रासह विविध राज्यात ते सत्तेवर होते. पण त्यांनी सर्व सामान्य नागरिकांकडे दुर्लक्ष केले. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला होय. या ठिकाणी कधी त्यांनी एखादी मोहीम, योजना राबविली नाही. खटाव माण या दुष्काळी भागांना न्याय देण्याचे काम भाजपने केले आहे. अगोदर फक्त घराणेशाही पहायला मिळायची भाजप सत्तेवर आल्यानंतर त्यांनी कामे करणारा व्यक्ती पाहिलं. सर्व सामान्य कुटुंबातील लोकांना न्याय दिला. आता पावसाळा लांबला आहे. पण मोदींनी शेतकऱ्याच्या सदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत ते हिताचे आहेत. त्यामुळे शेतकरी आज आनंदात आहे.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 9 वर्षे पूर्ण झालेल्या निमित्ताने आज कराडला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मोदींच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याचा काम झाले. प्रत्येक घरात ११ कोटी 88 लाख लोकांना हर घर जल च्या माध्यमातून पाणी देण्याचे काम, मुद्रा योजनेच्या माध्यमातून भारत सरकारकडून महिलांना कर्ज देण्याचे काम मोदी यांच्या माध्यमातून झाले.

डॉ. भोसलेंच्या हाती फडणवीसांच्या गाडीचे स्टेअरींग

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रात्रीपासून ते आज दुपारपर्यंत कराड दौऱ्यावर होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या संपूर्ण दौऱ्यासह भाजपच्या महाजनसंपर्क अभियान अंतर्गत लाभार्थी संमेलन व जाहीर सभेची जबाबदारी भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी यशस्वीपणे पेलली. इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री फडणवीस कराड दौऱ्यावर असताना त्यांचे गाडीचे सारथ्य डॉ. अतुल भोसले यांनी केले.

‘मविआ’ने सिंचनासाठी अडीच वर्षात एक दमडीही दिली नाही : फडणवीस

अडीच वर्षे दुसरं सरकार होत. एक तरी योजना या अडीच वर्षात सुरु होती का? आपण जे पैसे दिले त्यातून कामे सुरु होती. एक फुटकी कवडी देखील सातारा जिल्ह्याच्या सिंचन प्रकल्पाना अडीच वर्षाच्या सरकारने दिली नाही. मात्र, आपण उरमोडी, टेंभु आणि जिहे कटापुर या तीनही योजनांसंदर्भात आज आढावा घेत त्या योजनांना गती देण्यासाठी फेर प्रशासकीय मान्यता देऊन निधी देण्यासंदर्भात आज निर्णय घेतला असल्याचे फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना म्हंटले.

डॉ. अतुल भोसलेंनी आमदार व्हावं ही फडणवीसांची इच्छा : जयकुमार गोरे

भाजप जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी आजच्या मेळाव्यात आगामी काळात भाजपचा खासदार व आमदार होणार असल्याचे सांगितले. तसेच कराड दक्षिण विधानसभेसाठी आमदार म्हणून डॉ. अतुल भोसलेच होणार आहे. डॉ. भोसलेंनी आमदार व्हावं अशी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची इच्छा असल्याचे आमदार गोरे यांनी म्हंटले.