सातारा प्रतिनिधी । रात्रीच्या वेळी हाॅटेल्स, ढाबे निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी सुरू राहण्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. याचा विचार करुन पोलिस अधीक्षका समीर शेख यांनी रात्री १० पर्यंत खाद्यपदार्थ पुरविण्यास तर ११ : ३० वाजेपर्यंत आस्थापना बंद करण्याचा मोठा निर्णय जारी केला आहे. यामुळे यापुढे संबंधितांना वेळ पाळावी लागणार आहे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
याबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रात्रीच्यावेळी काही हाॅटेल्स, ढाबे निर्धारित वेळेपेक्षा जास्त कालावधीसाठी सुरू असतात. त्यामुळे मद्यपी व्यक्तींकडून अनुचित प्रकार होऊ शकतो. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊन गुन्हेगारी प्रकार घडण्याची दाट
शक्यता असते. अशा घटनांना प्रतिबंध करणे आवश्यक असल्याने हाॅटेल्स, ढाबा विहित कालावधीत बंद होणे गरजेचे आहे.
यासाठी रात्री १० वाजेपर्यंत ग्राहकांना खाद्यपदार्थ पुरविण्यास हरकत नाही. तर रात्री साडे अकराला आस्थापना बंद करावी लागणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व हाॅटेल्स, ढाबाचालकांना या नियमाचे पालन करावे लागणार आहे. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.