सातारा पोलिसांची मोठी कारवाई, लल्लन टोळीला ‘मोक्का’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात दहशत माजवून गुंडगिरी करणाऱ्या अजय उर्फ लल्लन जाधव टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. सातारा शहरातील प्रतापसिंहनगर, खेड या परिसरात लल्लन टोळीची दहशत होती. तरूणीला तलवारीने भोसकून गाड्यांच्या काचा फोडत दहशत निर्माण केल्यानंतर या गुंडांची बेकायदेशीर घरे पोलिसांनी बुलडोजरने जमीनदोस्त केली होती. आता मोक्काची कारवाई करत पोलिसांनी या टोळीचे कंबरडे मोडले आहे.

लल्लन जाधव टोळीतील गुंडांनी महिलेच्या घरावर दगडफेक करत दरवाजा तोडून महिलेल्या घरात घुसले होते. महिलेचा विनयभंग करून तिला तलवारीने भोसकले होते. त्यानंतर तलवारी, कोयते, लाकडी दांडकी घेवुन प्रतापसिंहनगरमध्ये दहशत माजवत गाड्यांच्या काचा फोडल्या होत्या. साताऱ्यातील प्रतापसिंहनगरमध्ये लल्लन टोळीची गुंडगिरी आणि गुन्हेगारी वाढली होती. दहशतीच्या जोरावर आर्थिक फायद्यासाठी संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या गुंडांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार लल्लन जाधव टोळीविरोधात मोक्का कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला होता.

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कारवाईस परवानगी दिली आहे. त्यानुसार टोळी प्रमुख अजय ऊर्फ लल्लन जाधव, राजू उर्फ बन्टी नवनाथ लोमटे, ओंकार भारत देढे, विकास रमेश खुडे, ऋत्वीक उर्फ रोहित लक्ष्मण उकीर्डे, मधुरमा दत्तात्रय जाधव, अनिता दत्तात्रय जाधव, दत्तात्रय उर्फ गदऱ्या काशीनाथ आसवरे, जय अमर कांबळे, सुनिल सुखदेव वाघमारे, मच्छिद्र उर्फ टकल्या भागवत बोराटे, किरण नागनाथ उकिर्ड, सागर रामा खुडे, विजय उर्फ बबल्या जाधव, पमी उर्फ पमीता दत्तात्रय बोराटे उर्फ जाधव आणि सुनिता दत्तात्रय जाधव (सर्व रा. प्रतापसिंहनगर, खेड, ता. जि. सातारा) यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. साताऱ्याचे डीवायएसपी राजीव नवले हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

हिंसाचाराची धमकी, दहशत निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, दरोड्याची तयारी, सशस्त्र दरोडा टाकणे, घरफोडी, शासकीय कामात अडथळा आणणे, विनयभंग, बलात्कार, अपहरण, गर्दी मारामारी, हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणे, अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. नोव्हेंबर २०२२ पासून १० प्रस्तावांमधील १२८ जणांवर मोक्का अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच १०१ जणांना हद्दपार करण्यात आलेलं आहे.