सातारा प्रतिनिधी । राज्यातील सरकारी शाळा आणि त्यातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. महायुती सरकारने शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेश वाटपाबाबत नुकताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे. याआधी राज्यातील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याची जबाबदारी स्वतः सरकारने घेतली होती. परंतु आता ही जबाबदारी सरकारने शालेय व्यवस्थापन समितीवर सोपवली आहे. त्यामुळे आता शाळांकडून स्थानिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करता येणार आहे. स्थानिक पातळीवर समितीने गणवेश बनवून घ्यायचे आहेत. सातारा जिल्ह्यात तब्बल २ हजार ६९० जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या शाळांमधील विद्यार्थ्याच्या गणवेशाचाही प्रश्न आहे.
राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेतंर्गत सुरुवातीला राज्यातील बचतगटांना गणवेश तयार करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, एक राज्य एक गणवेश या जुन्या योजनेवर निकृष्ट दर्जाचे कापड आणि शिलाईवरून राज्य सरकारवर टीका केली जात होती. तसेच वेळेत गणवेशही उपलब्ध होत नव्हते. अर्धे वर्षे उलटूनही अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेत काही बदल केले आहेत.
त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश पुरवठ्याची जबाबदारी आता पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे. थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश दिले जातील. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीला पैसे दिले जातील आणि स्थानिक पातळीवर गणवेश घेतले जातील. त्यानुसार आता शाळा विद्यार्थ्यांना वर्षाला गणवेशाचे दोन जोड उपलब्ध करुन देतील.
योजनेत काय बदल?
- गणवेश पुरवठ्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे.
- थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा व्यवस्थापनाला निधीचे वाटप.
- विद्यार्थ्यांना वेळेवर व नियमित गणवेश पुरवठा होणार.
- स्थानिक पातळीवर खरेदी व शिलाईमुळे रोजगार मिळणार.
सातारा जिल्ह्यात शाळांची संख्या
विद्यार्थी संख्या : 4 लाख 10 हजार
खासगी विनाअनुदानित शाळा : 32
अनुदानित शाळा : 614
जिल्हा परिषद शाळा : 2690
नगरपालिका शाळा : 5२
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संख्या : 2690
उर्दू शाळा संख्या : 8
बहुशिक्षकी शाळा संख्या : 941
द्वीशिक्षकी शाळा संख्या : 1332
जिल्हा परिषद, शिक्षण सेवक संख्या : 1332
जिल्हा परिषद, उपशिक्षक संख्या : 5756
पदवीधर : 1238
मुख्याध्यापक : 81
केंद्रप्रमुख : 49
शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग-3 श्रेणी-2 : 25
शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग-3 श्रेणी-3 : 2