अजित पवार गटाच्या मेळाव्यात कराड, पाटण तालुक्यांसाठी उदयनराजेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत बुधवारी कराडमधील हॉटेल फर्नमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा नुकताच एक संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात खा. उदयनराजेंनी मोठी घोषणा केली. कराडमधील जनसंपर्क कार्यालयात आठवड्यातील दोन दिवस आपण कराड उत्तर, दक्षिण आणि पाटण मतदार संघातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे उदयनराजेंनी सांगितले.

उदयनराजे म्हणाले की, पुर्वी सातारा आणि कराड असे दोन मतदार संघ होते. परंतु, आता सातारा हा एकच लोकसभा मतदार संघ असून तो खूप मोठा आहे. दोन हजाराहून अधिक गावे आणि सहा नगरपालिका आहेत. त्यामुळे गावोगावी पोहण्यासाठी धावपळ होत आहे. काही चुका झाल्या असतील, पण त्या अनावधानाने झाल्या आहेत. कोणाचे नुकसान केलेले नाही. कार्यकर्त्यांच्या सूचना रास्त आहेत. त्यानुसार आपण कराड आणि पाटण तालुक्यांसाठी आठवड्यातील दोन दिवस देणार आहोत. दोन्ही तालुक्यातील लोकांच्या समस्या कराडमधील जनसंपर्क कार्यालयात थांबून मी जाणून घेणार आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र डुबल म्हणाले, साताऱ्यातून नितीनकाका पाटील यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आमचा आग्रह होता. परंतु, महायुतीमध्ये भाजपमधून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. आम्ही तो शिरसावंद्य मानला. आ. मकरंद पाटील, नितीनकाकांनी आम्हाला खा. उदयनराजेंचे झोकून देवून काम करण्याची सूचना केल्यानंतर आम्ही प्रचाराला लागली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाल्यानंतर वातावरण बदलत चाललं आहे. कराड तालुक्यातून उदयनराजेंना निश्चितपणे आम्ही चांगले मताधिक्क्य देणार आहोत. उदयनराजे २००९ मध्ये पहिल्यांदा खासदार होवून संसदेत गेले. त्यावेळी राजघराण्यातील निवडून आलेले २० ते २५ जण उठून उभे राहिले. छत्रपतींचे थेट वंशज असलेल्या उदयनराजेंना देशात एवढा सन्मान आहे. शिवछत्रपतींसारखा राजा पाच हजार वर्षात झाला नाही आणि पुढेही होणार नाही. त्यांच्या वारसदाराला संसदेत पाठवणे आपल्या सगळ्यांचे आद्य कर्तव्य आहे.

ॲड. आनंदराव उर्फ राजाभाऊ उंडाळकर म्हणाले की, कराड दक्षिण मतदार संघातील पूर्व आणि पश्चिमेकडील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्याचप्रमाणे समस्या देखील वेगवेगळ्या आहेत. लोकांच्या विकासाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण प्राधान्य द्यायला पाहिजे. लोकांच्या संपर्कात राहिले पाहिजे. महायुतीला चांगले वातावरण असून खा. उदयनराजे भोसले निश्चितपणे विजयी होतील, याबद्दल शंका नाही. आम्ही त्यांना चांगले मताधिक्क्य देवू.