चायनीज मांजा कापल्याने दुचाकीस्वार झाला जखमी; साताऱ्यातील तरडगावातील घटना

0
401
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । चायनीज मांजामुळे अनेक दुचाकी अपघाताच्या तसेच पक्षांना दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, दुचाकीवरून घरी निघालेल्या एकाला तरडगाव येथे चायनीज मांजा कापून हाताच्या बोटांना दुखापत झाल्याची घटना रविवारी घडली.

नितीन दत्तात्रय शिंदे (वय ४७), असे जखमीचे नाव आहे. नितीन शिंदे (रा. कोपर्डे, ता. खंडाळा, हल्ली रा. पाच सर्कल, ता. फलटण) हे कोपर्डे येथील मूळगावी रविवारी शेतात काम करण्यासाठी गेले होते. शेतातील काम आटोपून ते आपल्या आत्यासोबत दुचाकीवरून पाच सर्कल येथे जाण्यासाठी निघाले. सायंकाळी सातच्या सुमारास तरडगाव ओढ्यावरील पुलाजवळ आल्यावर त्यांच्या गळ्याला चायनीज मांजा अडकला.

तोंडाला बांधलेला रुमाल कापून मांजा गळ्याला लागताच त्यांनी चटकन हाताने मांजा धरून स्वतःचा बचाव केला. यामध्ये गळ्याला थोडी दुखापत झाली. मात्र, हाताच्या चार बोटांना इजा होऊन मोठ्या जखमा झाल्या. घटनेनंतर शिंदे यांना तत्काळ येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.