सातारा प्रतिनिधी | सातारा पाेलिस दलातील भुईंज पोलिसांच्या पथकाने खासगी बसमधून पैशाची बॅग चोरणाऱ्या दोन परप्रांतीयांना उत्तरप्रदेश येथून अटक केली. आरोपीना अटक केल्यानंतर त्यांना घेऊन पथक आज साताऱ्यात दाखल झाले. दरम्यान, त्यांच्याकडून ८३ लाखांची राेकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.
हसन जुम्मन मोहम्मद (वय २२, रा. भवानीगड, महाराजगंज, जिल्हा रायबरेली, उत्तरप्रदेश) तसेच इस्तियाक जान मोहम्मद (वय २१, रा. पडरिया, महाराजगंज, जिल्हा रायबरेली, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २२ फेब्रुवारी रोजी वाई तालुक्यात बोपेगाव येथील एका हॉटेल परिसरात खासगी बसमधून 96 लाख रुपयांची चाेरी झाल्याची घटना घडली होती. याबाबतची तक्रार भुईंज पोलिस ठाण्यात फिर्यादीने नाेंदवली हाेती. त्यानंतर पाेलिसांनी या घटनेचा कसून तपास केला.
पाेलिसांच्या पथकाने घटना स्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता त्यांना २ तरुणांच्या हालचाली संशयास्पदरित्या आढळून आल्या. त्यादृष्टीने पोलिसांनी अक पथक तयार केले. ते पथक उत्तर प्रदेश येथे पाठवले. दरम्यान, त्या ठिकाणी शोध मोहीम राबवून संशयितांना ताब्यात घेतले. दाेघांना घेऊन पोलिसांचे पथक आज साताऱ्यात दाखल झाले. यावेळी पोलिसांनी चोरटयांकडून चोरून नेलेल्या 83 लाख रुपये हस्तगत केले आहे.