सातारा प्रतिनिधी | मागील वर्षभरापासून जिल्हा पोलीस दलाने मोक्का आणि तडीपारीच्या कारवाईचा धडाका लावला आहे. त्यात सातत्य राखून संघटीत तसेच मारामारी, सावकारी, खंडणी, अपहरणासारखे गुन्हे दाखल असणार्या गुन्हेगारांना हिसका दाखवला आहे. आता अवैध व्यवसाय करणार्यांवरही कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारला आहे. जुगार आणि चोरटी दारू विक्रीचे सातत्याने गुन्हे करणार्या दोघांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. दीपक शामराव बारागडे (वय ४८) आणि महेश रामचंद्र जाधव (वय ३९, दोघेही रा. कुडाळ, ता. जावळी), अशी त्यांची नावे आहेत.
जुगार, दारू विक्रीचे अनेक गुन्हे
अवैद्य जुगार-मटका घेणे आणि बेकायदेशीरपणे दारुची चोरटी विक्री, असे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सातत्याने ते असे गुन्हे करत होते. म्हणून भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी या दोन्ही गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. वाई उपविभागीय पोलीस अधिकार्यांनी प्रस्तावाची चौकशी केली होती.
कारवाई करूनही सुधारणा नाही
दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई केली जात होती. जामीनावर सुटल्यानंतर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र, कायदेशीर कारवाईचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. अथवा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नाही. ते सातत्याने गुन्हे करीत होते. कायद्याचा धाक न राहिल्याने दोघांवर कारवाई करण्याची मागणी नागरीकांतून होत होती.
प्राधिकरणाने दिला तडीपारीचा आदेश
हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या समोर हद्दपारीच्या प्रस्तावावर सुनावणी झाली. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये दोन्ही आरोपींना दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश हद्दपार प्राधिकरणाने पारीत केला आहे. नोव्हेंबर २०२२ पासून १० उपद्रवी टोळ्यांमधील २६ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. यापुढेही सराईत गुन्हेगारांवर हद्दपारी, मोक्का, एमपीडीएच्या कारवाया करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिला आहे. हद्दपार प्राधिकरणापुढे अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस नाईक प्रमोद सावंत, कॉन्स्टेबल केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी पुरावा सादर केला.