विद्यानगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी 5 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | विद्यानगर – सैदापूर, ता. कराड येथील बनवडी फाटा ते कृष्णा कॅनॉल चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या विकासकामाचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी ९ वाजता केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्प मार्च २०२३ मधून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून आणि भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, श्रीनिवास जाधव व प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या विशेष प्रयत्नातून राज्यमार्ग १४२ अंतर्गत विद्यानगर – सैदापूर (ता. कराड) येथील बनवडी फाटा ते कृष्णा कॅनॉल चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

या विकासकामाचे भूमिपूजन मंगळवारी (ता. ९) सकाळी ९ वाजता विद्यानगर भाजीमंडईसमोर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते होणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते कराड दक्षिण मतदारसंघातील लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण केले जाणार आहे. याप्रसंगी राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तत्पूर्वी सकाळी ९.३० वाजता ना. मिश्रा सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात नवमतदारांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील यांनी केले आहे.