कराड प्रतिनिधी । बनवडी (ता. कराड) येथे ग्रामनिधीच्या माध्यमातून सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये वॉकिंग ट्रॅक, ऑक्सिजन पार्क आणि वाचनालय उभारण्यात येणार आहे. या विकासकामांचे माजी उपसरपंच तथा सदस्य विकास करांडे यांच्या हस्ते भूमिपूजन आज करण्यात आले.
यावेळी विकास करांडे म्हणाले की, ज्यावेळी बनवडी गावची ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. त्यावेळी बनवडीतील ग्रामस्थांना आम्ही विकासकामांची आश्वासने दिली होती. त्या आश्वासनाची पूर्तता होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यापुढेही अशाच प्रकारची विकासकामे आम्ही करत राहणार असून विकास कामात बनवडी ग्रामपंचायत नेहमी अग्रेसर राहील.
यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमास बनवडी गावचे सरपंच प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य अख्तर आत्तार, माजी उपसरपंच सुरेंद्र विभुते, हारून पठाण, भाजप तालुका उपाध्यक्षा नम्रता कुलकर्णी, शीलवंत काका, श्रीकांत जाधव, पिंटू शिंदे, विजय खापे, मिलिंद पोतनीस, सदाशिव नागणे, प्रमोद सावंत, अधिकराव कोळेकर, संदीप साळुंखे, प्रकल्प विस्तारक राजू तळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.