सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद परिसरातील जुनी जिल्हा लोकल बोर्ड इमारत वारसा स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या वारसा स्थळाच्या कामाचे आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, रविराज देसाई, जयराज देसाई, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनिल काटकर, जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी राहूल कदम, प्रकल्प संचालक डी. आर.डी.ए संतोष हराळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन घुले, अर्चना वाघमोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्हा परिषद स्थापन होण्यापूर्वी ग्रामीण क्षेत्राशी संबंधित विकास कामांशी अंमलबजावणी जिल्हा लोकल बोर्डामार्फत केली जात होती. सन 1941-1952 या कालावधीत सलग 12 वर्षे लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदी कार्यरत होते. दि. 27 जून 2019 रोजी जुनी इमारत याचा समावेश वारसा स्थळ जतन समिती मार्फत हेरिटेज श्रेणी ब मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
सदयस्थितीत या वास्तुमध्ये जिल्हा परिषद उपहारगृह, जि.प.सेवकांची आर्थिक सहकारी पतपेढी, जिल्हा गुण नियंत्रण प्रयोगशाळा, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, यांत्रिकी उपविभाग सातारा,अभिलेख शाखा, आधारकार्ड सेतू कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अशी विविध कार्यालये कार्यरत आहेत.
पुर्वीप्रमाणे इमारतीच्या ज्या भागात सभागृह होते. त्या ठिकाणची कार्यालये इतरत्र स्थलांतरित करुन सदरची वास्तु वारसा स्थळ जतन समितीच्या नियमावलीप्रमाणे जतन करणे आवश्क आहे, यासाठी या वास्तुला वारसा स्थळ म्हणून जतन करण्यात येणार आहे.