कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शिरवळमधील नव्या कॅम्पसचे उद्या भूमिपूजन

0
78
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील शिंदेवाडीमध्ये कृष्णा विश्व विद्यापीठाच्या नव्या भव्य कॅम्पसची उभारणी करण्यात येणार आहे. या नव्या कॅम्पसचे भूमिपूजन सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून उद्या रविवार दि. २२ रोजी दुपारी २ वाजून ११ मिनीटांनी, विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे.

गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकीत असलेल्या कृष्णा विश्व विद्यापीठाचा नवा कॅम्पस शिरवळजवळच्या शिंदेवाडीत साकारला जाणार आहे. मुंबई – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर व निरा नदीच्या काठालगत सुमारे ५० एकरच्या विस्तीर्ण जागेवर साकारण्यात येणाऱ्या या कॅम्पसमध्ये, सुमारे ६५० खाटांचे शिक्षण रुग्णालय उभारले जाणार आहे. तसेच २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसह वैद्यकीय, आयुर्वेदीक, दंतविज्ञान, फिजीओथेरपी, नर्सिंग, फार्मसी कॉलेजची उभारणी केली जाणार आहे. या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी भव्य क्रीडांगण, तसेच कर्मचाऱ्यांसाठी निवासी क्षेत्र उभे केले जाणार आहे. याशिवाय स्वतंत्र १० एकर जागेवर अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, व्यवस्थापन अशा अन्य व्यावसायिक महाविद्यालयांचीही उभारणी केली जाणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या संचालिका सौ. गौरवी भोसले, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, शैक्षणिक व मानांकन विभागाचे सल्लागार डॉ. प्रविण शिंगारे, व्यवस्थापन मंडळ सदस्य विनायक भोसले, दिलीप पाटील, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आदींसह विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

स्व. जयवंतराव भोसले यांची १०० वी जयंती

कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांची रविवार दि. २२ डिसेंबर रोजी १०० वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील स्व. आप्पासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पार्पण व अभिवादन केले जाणार आहे.