धैर्यशील कदम हेच कराड उत्तरचे खरे दावेदार – भिमराव पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा मतदारसंघावर सध्या भाजपचेच चार उमेदवार आपापली दावेदारी सांगत आहेत. मात्र, धैर्यशील कदम यांनी मतदारसंघात पक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत आणलेला कोट्यावधींचा निधी, त्यांचा दांडगा जनसंपर्क, त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा, सक्षम मतगठ्ठा आणि मतदारसंघातील पोषक वातावरण पाहता तेच खरे कराड उत्तरचे दावेदार आहेत. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हा मतदारसंघ भाजपला सोडून धैर्यशील कदम यांनाच अधिकृत उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील यांनी दिली.

बनवडी (ता. कराड) येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शंकरराव शेजवळ, संपतराव माने, राजेंद्र चव्हाण, पृथ्वीराज निकम, दिपाली खोत, सीमा घार्गे, महेश घार्गे, नविन जगदाळे, श्रीकांत पिसाळ, सुमित शहा, विलास आरवडे, अविनाश साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी भीमराव पाटील म्हणाले, 2009 च्या निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून धैर्यशील कदम यांना मिळणारे तिकीट ऐनवेळेला खा. उदयनराजे भोसले यांच्या आग्रहास्तव डॉ. अतुल भोसले यांना देऊन माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर 2014 मध्ये सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या. तेव्हा धैर्यशील कदम यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांना अंतर्गत विरोध झाला. तर 2019 च्या निवडणुकीत भाजपसाठी चांगले वातावरण होते. परंतु, मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने धैर्यशील कदम यांना महायुतीच्या माध्यमातून सेनेची अधिकृत उमेदवारी मिळाली. परंतु, ऐनवेळी मनोज घोरपडे यांनी बंडाळी केल्याने चांगली संधी हुकली. अन्यथा, 2019 मध्येच कराड उत्तरमध्ये परिवर्तन झाले असते.

भाजपचे नेते धैर्यशील कदम त्यांच्यावर 2009, 2014 आणि 2019 या तिन्ही विधानसभा निवडणुकांवेळी अन्याय झाला आहे. त्यांनी आतापर्यंत भाजपच्या माध्यमातून कोट्यावधींची विकासकामे खेचून आणली असून येथील उमेदवारीवर त्यांचा पहिला हक्क आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारसंघातील जनतेचा कौल घेऊन खरी परिस्थिती जाणून घेत धैर्यशील कदम यांना कराड उत्तरमधून भाजपची अधिकृत उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.