कराड प्रतिनिधी | महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्यांच्या बरोबर असते. त्यांनाच महाराष्ट्र सर्वाधिक जागा मिळतात. शिवसेना होती तेव्हा त्यांना २३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता ठाकरेंची शिवसेना नसल्याने ते आता ९ जागांवर घसरले आहेत. शिवसेनेबरोबर केलेल्या विश्वासघातामुळेच भाजपाची घसरगुंडी झाल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना विभागीय संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली.
कराड येथे शनिवारी बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर आमदार भास्करराव जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, उपनेत्या छायाताई शिंदे, सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम, सचिन मोहिते, संजय भोसले, सांगली जिल्हाप्रमुख संजय विभूते, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटलांना शंभुराज देसाई यांनी १३ तारीख दिली होती. परंतु आता मंत्री देसाई यांच्याकडून महाविकास आघाडीने सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकल्याने विलंब होत असल्याचे म्हटले होते. मात्र भास्कर जाधव यांनी विरोधकांना विश्वासात न घेता शब्द दिला आहे. तरी आम्ही त्याला विरोध केला नाही. आता आमच्यावर खापर फोडले तरी ते खापर फुटणार नाही. त्या खापऱ्या खाण्याची वेळ त्यांच्यावर जे येईल, असे म्हटले आहे.