Satara Waterfalls : साताऱ्यातील भांबवली वजराई धबधबा फेसाळला; देशातील सर्वाधिक उंचीच्या धबधब्याचे विहंगम दृश्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या मान्सूनमुळे सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या धबधब्यांतून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. सातारा जिल्ह्यातील असे डोळ्याचे पारणे फेडणारे धबधबे (Satara Waterfalls) आहेत. पावसाळ्यात तुम्ही जर फिरायचा प्लॅन करत असाल तर सातारा जिल्ह्यातील देशातल्या सर्वात उंच अशा भांबवली वजराई धबधब्याला तुम्ही नक्की भेट द्या. पर्यटकांचे लक्ष वेधणारा भारतातील सर्वाधिक उंचीचा भांबवली वजराई धबधब्याचा हंगाम शुक्रवारपासून सुरू झाला असल्याने पर्यटकांमध्ये आनंद, उत्साहाचे वातावरण आहे.

देशातील सर्वाधिक उंचीचा भांबवली वजराई धबधबा आता पर्यटन विकासासाठी सज्ज झाला आहे. परिसर डोंगराळ असून, घनदाट झाडीचा असल्यामुळे पर्यटकांना चालताना कसरत करावी लागते. विशेष करून वयस्कर पर्यटकांची मागणी होती की चालण्यासाठी सोयीस्कर पायवाट व्हावी. जांभ्या दगडाची पायवाट झाली आहे. पर्यटक हिरव्यागर्द झाडीतील धुवाँधार पावसाचा व धबधब्याचा थ्रिलिंग अनुभव घेण्यासाठी जुलै, ऑगस्ट महिन्यांत भांबवली वजराई धबधब्याला भेट देतात. भांबवलीतील सध्याचे वातावरण मनमोहक असून, धुवाँधार पावसाच्या सरी, गार-गार वारा, रानकिड्यांचे आवाज, हिरवी गर्द झाडी, धबधब्याच्या पाण्याचा प्रचंड प्रपात, निसर्गाचा खुललेला नजारा पाहून मन प्रफुल्लित होत आहे.

भांबवली वजराई धबधब्याला २०१८ मध्ये ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता मिळून धबधब्याच्या विकासाचे काम सुरू झाले. घनदाट जंगल, दुर्गम डोंगरातून जाताना पर्यटकांना कसरत करावी लागायची. पहिल्या टप्प्यातील पायऱ्या, रेलिंगच्या कामामुळे डोंगरातून घसरगुंडीची समस्या दूर झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात वाॅच टाॅवर व पॅगोडाचे काम झाले असून, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येत आहे. तिसऱ्या टप्प्यातील बांबू (गेस्ट) हाऊसचे काम पूर्ण झाले असून, पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद मिळेल.

आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा

आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा म्हणून ‘भांबवली वजराई’ हा धबधबा ओळखला जातो. मुख्य म्हणजे, हा धबधबा आपल्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात आहे. सातारा शहरापासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भांबवली गावात हा धबधबा आहे. प्रसिद्ध कास तलावापासून पुढे सुमारे ५ किलोमीटर अंतरावर या धबधब्याचे अत्यंत सुंदर आणि डोळ्याचे पारणे फिटेल असे विहंगम दृष्य पहायला मिळते. सातारा जिल्ह्यातील ‘भांबवली वजराई’ या धबधब्याची उंची तब्बल १ हजार ८४० फूट इतकी आहे. शिवाय हा धबधबा अत्यंत घनदाट जंगलात असल्याने त्याच्या आसपासचा परिसर फारच सुंदर आहे. देशातील सर्वात उंच असा हा धबधबा उरमोडी नदीत उगम पावतो.