सातारा प्रतिनिधी | दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संत गाडगेबाबा व्याख्यानमालेचे सातत्यपूर्ण असणारे प्रबोधनात्मक कार्य, यशस्वीतांचा गुणगौरव प्रेरणादायी असल्याचे सातारच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री फरांदे यांनी स्पष्ट केले.
दुधेबावी, ता. फलटण येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत यूपीएससी, एमपीएससी परीक्षेतील यशस्वीतांना राज्यस्तरीय यशवंत पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी सातारा विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे, चांडाळ चौकडीच्या करामती, भुंडीस चित्रपट फेम अभिनेते रामभाऊ जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी सुहास रणसिंग, मंडल कृषी अधिकारी शहाजी शिंदे, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय दडस यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ.भाग्यश्री फरांदे म्हणाल्या, गावागावातून व्याख्यानमाला झाल्यास निश्चितपणे सकारात्मक परिवर्तन होईल. माणूस म्हणून एकत्र राहण्याचे काम व्याख्यानमाला करत असतात. मोबाईलमुळे वैचारिक गुलामगिरी वाढत असून व्याख्यानमालांमुळे वैचारिक प्रगतीत वृद्धी होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. सातत्यपूर्ण २४ वर्ष व्याख्यानमाला, गुणगौरव समारंभ आयोजित करणे ही निश्चितपणे अभिमानाची बाब आहे.गुणगौरव केल्याने ग्रामीण भागातील युवक युवतींना प्रेरणा मिळत असल्याचे सौ. फरांदे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास सेवानिवृत्त मंत्रालय उपसचिव दिनकरराव सोनवलकर, कृषी सहाय्यक सागर पवार, प्रा.रवींद्र कोलवडकर, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष धनंजय सोनवलकर, कृषी मित्र संजय सोनवलकर, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषराव सोनवलकर, प्रतिष्ठानचे खजिनदार डॉ. युवराज एकळ, तात्याबा सोनवलकर, भिमराव नाळे, पोपटराव सोनवलकर, अण्णासाहेब भुंजे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले. प्रास्ताविक सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर यांनी केले.