फलटणची जागा भाजपा ताकदीने लढवणार; माजी केंद्रीय मंत्री खुबांचे महत्वाचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जागा भाजपला मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून फलटण – कोरेगाव विधानसभेची निवडणूक ही भाजपा ताकदीने लढवणार आहे. राज्याचे नेते उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकासाचा व भाजपाच्या विचारांचाच आमदार असणार आहे; असे मत माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते भगवंत खुबा यांनी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवंत खुबा हे सातारा जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी काल शनिवार दि. 21 रोजी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदारसंघातील विविध ठिकाणी सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रभाकर जाधव, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, रणजितसिंह भोसले, अमोल सस्ते, राजेंद्र नागटिळे व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनमत मिळाले होते. त्यावेळी शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची कोणतीही ऑफर दिली नाही किंवा शब्दही दिला नव्हता. परंतु मुख्यमंत्री पदासाठी व सत्तेसाठी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर कधी आपल्याला बसलेले दिसले होते का? अडीच वर्षात महाराष्ट्र विकासात मागे पडला. त्यानंतर आपण गप्प बसून राहिलो नाही.

राज्यात सत्ता स्थापन केली व पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एक नंबरचे राज्य करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या दृष्टीने आज महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक येत आहे. तसेच कोट्यवधी रुपयांची विकासकामे होत आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे 140 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागा; असे खुबा यांनी स्पष्ट केले.