सातारा प्रतिनिधी | मध्य रेल्वेच्या (Central Railway) पुणे विभागातील लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील इंजिनिअरिंग व इतर कामांसाठी पुणे-सातारा लोहमार्गातील जरंडेश्वर – सातारा या दरम्यान आजपासून दि. २६ शुक्रवार अखेर दि. २९ ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात आलेला असून, त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या नियमित वेळेपेक्षा उशिरा सुटणार आहेत.
मंगळवारी दि.२६ रेल्वे गाडी क्रमांक ०१४२३ पुणे-मिरज एक्स्प्रेस रेल्वे गाडी क्रमांक ०१४२४ मिरज- पुणे एक्स्प्रेस या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी दि.२६ व शुक्रवारी दि.२९ कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमधून नियमित ०८.१५ वाजता सुटणारी रेल्वे गाडी क्रमांक ११०३० कोल्हापूर- मुंबई कोयना एक्स्प्रेस ही ०९.४५ वाजता अर्थात दीड तास उशिरा सुटणार आहे.
मंगळवारी दि.२६ रोजी कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमधून नियमित ०९.१० वाजता सुटणारी रेल्वे गाडी क्रमांक १२१४७ कोल्हापूर- हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस १०.४५ वाजता अर्थात दीड तास उशिरा सुटणार आहे. बुधवारी (ता. २७), गुरुवारी (ता. २८) व शुक्रवारी (ता. २९) कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमधून नियमित पाच वाजता सुटणारी रेल्वे गाडी क्रमांक ११४२६ कोल्हापूर- पुणे डेमू सात वाजता अर्थात दोन तास उशिरा सुटणार आहे. हा ब्लॉक घेणे दुहेरीकरण, देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांनी ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.