रखरखत्या उन्हात ‘त्यांनी’ काढला हक्काच्या घरकुलासाठी कराडच्या तहसील कार्यालयावर मोर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सन २०१८ पासून कराड तालुक्यातील सर्व गावातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील प्रतिक्षा यादीत असलेल्या सर्व वंचित कुटुंबाना घरकुल मिळनेबाबत तसेच घरकुलाच्या अनुदान मागणीसाठी आज घरकुल संघर्ष समितीच्या वतीने कराडच्या तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी रखरखत्या उन्हात कराड तालुक्यातील नागरिक, महिलांनी आक्रोश व्यक्त करत प्रशासनाकडे घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची निवेदनाद्वारे मागणी केली.

कराड तहसील कार्यालयावर आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घरकूल संघर्ष समितीचे प्रमुख व वाहगावचे सरपंच संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व महिलांनी मोर्चा काढला. यावेळी त्यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीबाहेर पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन दिले. प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सन २०१८ पासून कराड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात येणारे अंदाजे २०० ग्रामपंचायत कार्यक्षेत्र असणाऱ्या आपल्या तालुक्यात प्रत्येक गावात ५०,६० ते १०० च्या पटीत लाभार्थी प्रतिक्षा यादीत समाविष्ठ आहेत.

माणसाच्या मुलभूत असणाऱ्या गरजेपैकी निवारा अर्थात हक्काचे घर व्हावे हे प्रत्येक व्यक्तिचे स्वप्न असते. पण गेल्या ६ वर्षापासून प्रतिक्षा यादीत असलेल्या सर्व वंचित लाभार्थ्यांना घरकुल मंजूर व्हावे यासाठी वनवन फिरावे लागत आहे. तसेच जर वर्षी एका गावात एक किंवा दोन घरकुल शासन स्तरावरुन मंजूर करुन इतर लाभार्थ्यांची एक प्रकारची फसवणुक शासन करत असते. तरी सर्व वंचित लाभार्थी असणाऱ्या सर्व कुटूंबाना शासनाने त्वरीत मंजूरी देऊन सहकार्य करावे.

तसेच शासन स्तरावरुन प्रधानमंत्री घरकुल आवास योजना, रमाई आवास, यशवंत घरकुल योजना यासाठी मिळणारे अनुदान १ लाख २० हजार ते दीड लाख रुपये हे अत्यंत तुटपुंजे असून ते अनुदान ३ ते ४ हप्त्यात लाभार्थी कुटूबांना दिले जाते. तरी शासनाने सदर अनुदान ३ लाख रुपये करून २ हप्त्यात लाभार्थी कुटूबांला देण्यात यावी. व जरवर्षी मंजूर प्रतीक्षा यादीतील जास्तीत जास्त कुटूबांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा अन्यथा येथून पुढील काळात प्रशासनाच्या विरोधात आम्ही तीव्र लढा करु असा इशारा ग्रामस्थांसह नागरिकांनी यावेळी प्रशासनास दिला.

कराड तालुक्यातील घरकुल संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाद्वाराने कराड येथील प्रशासनास निवेदन देण्यात आले. तसेच निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील पाठविण्यात आलेल्या आहेत.

कराड तालुक्यातील 9850 लाभार्थी अनुदानापासून वंचित

कराड तालुक्यात ९ हजार ८५० हुन अधिक मंजूर लाभार्थी आहेत. मात्र, त्यांना शासनाकडून घरकुलासाठी अनुदान अजूनही जमा झालेले नाही. अनेकवेळा संघर्ष समितीच्या माध्यमातून मागणी केली. मात्र, निधीच येत नसल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. जो निधी दिला जातोय तो अपुरा आहे. याबाबत तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी आचारसंहिता झाल्यानंतर महिनाभरात मागण्याबाबत दखल घेऊ, असे आश्वासन दिले असल्याची माहिती वहागावचे सरपंच संग्राम पवार यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.