‘मांघर’मधील मधमाश्या संकटात!; उत्पादनात 30 ते 40 टक्के घट

0
2

सातारा प्रतिनिधी । देशातील पहिले मधाचे गाव ‘मांघर’ मधील मधमाश्या संकटात सापडल्या आहेत. मधपेटी, मधमाश्यांच्या पोळ्याला अमेरिकन ‘फ्राऊलब्रुड’ रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्याचा फटका मध उत्पादनाला झाला आहे. मांघरमधून वर्षाला पंधरा हजार किलो मध देशातील विविध बाजारपेठेत पाठवला जातो. ‘फ्राऊलब्रुड’ मुळे या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाली आहे.

महाबळेश्वरच्या मांघर गावातील ८० टक्के ग्रामस्थ मधाचे उत्पादन गेली ५० वर्षे घेत आहेत. तीन रुपयांपासून सुरू झालेला हा व्यवसाय आता ७०० ते ८०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने मे २०२२ मध्ये या गावाला देशातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषित केले. येथील ग्रामस्थांना शास्त्रोक्त पद्धतीने मध संकलनाचे धडे दिले गेले आहेत. महाबळेश्वर परिसरातील वनसंपदा, शेतपिके, तेलबियाणे, रानफुले यामुळे या भागात मधमाश्यांचे प्रमाण जास्त आहे.

ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी उत्पन्न स्रोतासाठी ग्रामोद्योग मंडळाने मधपेट्या दिलेल्या आहेत. या मधपेटीने मध संकलन प्रक्रिया सोपी झाली आहे. जंगलातील एक राणी माशी ओळखून ती या मधपेटीत बंदिस्त केल्यानंतर इतर मधमाश्या आपोआप जमा होतात. मध संकलनाची ही पद्धत प्रभावी ठरली आहे. फ्राऊलब्रुड या संकटाबरोबर पावसाची उघडीप लवकर न झाल्याने जंगलातील फुलोराला त्याचा फटका बसला आहे. दर सात वर्षांनी येणाऱ्या कारवीच्या फुलझाडामुळे मधमाश्यांना मिळणाऱ्या मधामध्ये अडथळा आला आहे. त्याचा फटका मध उत्पन्नाला बसला असल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.