कराड प्रतिनिधी | मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर दौऱ्यावर असणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांची आज रात्री कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भव्य अशी सभा होणार आहार. या सभेची तयारी जवळपास पूर्ण झाली असून संपूर्ण राज्याचं जरांगे पाटील यांच्या येथील होणाऱ्या सभेकडे लागले आहे. या ठिकाणी सभेला होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान नुकतेच डॉग स्कॉड, बॉम्ब शोधक पथक, स्पेशल पोलिसांची टीम सभास्थळी दाखल झाली असून या टीमकडून सभास्थळाची तपासणी केली जात आहे.
मराठा समाजातील आबाल वृद्धांशी संवाद साधण्यासाठी जरांगे- पाटील आज कराड येथे येत आहेत. छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये त्यांची आज विराट सभा होणार असून सभेला कराड -पाटण तालुक्यासह जवळच्या कडेगाव, शिराळा, सातारा, खटाव तालुक्यांतील एक लाख मराठा बांधव-भगिनी उपस्थित राहतील अशी माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे.
असा आहे तगडा पोलिस बंदोबस्त
पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामध्ये १ डीवायएसपी, २ पोलीस निरीक्षक, २३ सहाय्यक पोलिस निरीक्षक, १८५ अंमलदार, ५० वानिशा, ७५ होमगार्ड, स्टायकिंग १०, आरसीपी ७, खासगी सुरक्षा रक्षक २० यासह दंगा काबू पथक एक व साध्या वेशातील विविध पोलिसांची पथके तैनात राहील.
दंगा काबू पथकाकडे अशी आहे साधन सामुग्री
कराड येथील जरांगे पाटील यांच्या सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णपणे काळजी पोलिसांकडून व संयोजकांकडून घेतली जाणार आहे. दरम्यान, सुरक्षेच्या करणास्थव पोलिसांनी दगा काबू पथक या ठिकाणी तैनात केले आहे. या पथकाकडे २५ लाठी, ५० ढाली, २५ हेल्मेट, १ गॅसगन, ६४ एसएलआर, १० इंसास, ५ कारबाईन, १२ बोअर, २ पिस्टल, १ एके ४७ अशी शस्त्रे ठेवण्यात आली आहेत.
नुकतीच पार पडली बैठक
कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर कराड येथे नुकतीच पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, वाहतूक शाखेचे चेतन मछले यांच्याशी मराठा समन्वयकांची बैठक पार पडली. यावेळी नागरिकांची सुरक्षा, पार्किंग व अन्य वाहतुकीच्या विषयासंदर्भात चर्चा झाली.