बार्शीतील वाघोबा लवकरच येणार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात

0
52

सातारा प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आढळून आलेल्या एका वाघाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा प्रस्ताव पुणे, नागपूर येथील वन विभागाने मुख्यालयाला पाठवला होता. मुख्य वन्यजीव रक्षकांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली असून या वाघाला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणले जाणार आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली विभागात आधीच दोन पट्टेरी वाघ आहेत. बार्शीतील पट्टेरी वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आल्यास या प्रकल्पातील वाघांची संख्या तीन होणार आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही वाघ नर असणार आहेत. बार्शी परिसरात वाघाचा अधिवास नसून, त्याला पुरेसे खाद्यही उपलब्ध नाही, पाळीव जनावरांवरील हल्ले टाळण्यासाठी त्याला तेथून हलवणे यथोचित ठरेल, असे स्पष्टीकरण वन विभागाने दिले आहे.

हा वाघ टिपेश्वर अभयारण्यातून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बार्शी तालुक्यामध्ये दाखल झाला आहे. त्याने 500 किलोमीटर अंतर पार केले असून, बार्शी ते धाराशिव परिसरात त्याचा वावर आहे. बार्शीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याची चर्चा असल्याने, त्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये अचानक वाघाचे दर्शन घडले होते.

दरम्यान, बार्शी परिसरात वाघांसाठी आवश्यक अधिवास नाही, पुरेसे नैसर्गिक खाद्यही उपलब्ध नाही. त्यामुळे वाघ पाळीव प्राण्यांची शिकार करण्याची शक्यता आहे. त्यातून वाढणारा संघर्ष टाळण्यासाठी आम्ही वाघाला दुसरीकडे हलवण्याचा विचार केला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या वाढवण्यासाठी लवकरच विदर्भातून वाघ आणण्यात येणार आहेत. त्यामुळे या वाघालाही तिथे सोडता येऊ शकते. नागपूर येथून प्रस्तावावर निर्णय झाल्यावर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.