सातारा प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. वाई तालुक्यातील किसन वीर सहकारी साखर कारखानाच्या माजी संचालक मंडळावर बँक ऑफ इंडियाची ६१ कोटी १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार मदन भोसले, उपाध्यक्ष चंद्रकांत इंगवले, कार्यकारी संचालक अशोक जाधव यांच्यासह संचालक मंडळावर सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे.
विस्तारीकरणासाठी बँकेनं दिलं होतं ५० कोटींचं कर्ज
किसन वीर सहकारी साखर कारखान्यास विस्तारीकरणासाठी बँक ऑफ इंडियाने ५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. २०१० सालापासून कारखान्याचे आणि बँकेचे व्यवहारिक संबंध चांगले होते. त्यामुळे बँकेने एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर केले. ही रक्कम सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेत असलेल्या कारखान्याच्या करंट खात्यावर वळविण्यात आली. बँकेने एक कोटी ७० लाख ४३१ रुपये व्याज खात्यामध्ये जमा करून घेऊन ही रक्कम कारखान्याला दिली होती. त्यानंतर ही रक्कम कारखान्याकडून थकीत झाली.
खोटी अर्थिक विवरणपत्रे जोडल्याचा आरोप
कारखान्याने डिस्टिलरी उभारणीसाठी डोंबिवली नागरी सहकारी बँकेकडून कर्ज घेताना बँक ऑफ इंडियाला दिलेली मालमत्ताच डोंबिवली बॅंकेला तारण देऊन बॅंक ऑफ इंडियाची फसवणक केली, कर्ज मिळवण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने खोटी आर्थिक विवरणपत्रे आणि कागदपत्रे सादर केली. बँकेच्या सुविधांचा गैरविनियोग केला, असं बँकेने दिलेल्या फिर्यादीत म्हटटलं आहे.
थकित कर्जावर कारवाईवेळी फसवणुकीचा प्रकार उघड
कर्जाच्या थकबाकी प्रकरणी कारवाई करताना बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे बँक ऑफ इंडियाचे पुणे विभागीय व्यवस्थापक (वसुली) अनिल कुमार श्रीवास्तव यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सीबीआयकडं तक्रार दाखल केली होती. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त (नवी दिल्ली) मनीष नवलाखे पुढील तपास करत आहेत.