कराड प्रतिनिधी । ऊसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये मिळावा. तसेच चालू हंगामाची उचल चार हजार रुपये मिळावी, या मागण्यांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने बुधवारी कराड येथील तहसील कार्यालयासमोर खर्डा-भाकरी आंदोलन करण्यात आले. यावेळी साखर कारखानदारांचा व प्रशासनाचा निषेध करण्यात आला. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, सांगली जिल्हाध्यक्ष डॉ. उन्मेश देशमुख, युवा प्रदेशाध्यक्ष गणेश शेवाळे, दिगंबर मोरे, ‘शेकाप’चे समीर देसाई, कराड तालुकाध्यक्ष आनंदराव थोरात, प्रकाश पाटील, पोपटराव जाधव, दीपक पावणे, शंभूराजे पाटील, सुनील कोळी आदी उपस्थित होते.
शासनाकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. प्रशासन कारखानदारांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळावा. उसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये मिळावा. तसेच चालू हंगामाची उचल चार हजार रुपये मिळावी, सोयाबीन हमीभाव केंद्रे लवकरात लवकर सुरू करावी. दुधाला शंभर रुपये दर व सोयाबीनला आठ हजार रुपये दर मिळावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन संघटनेच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले.