कराड प्रतिनिधी । सातारा पोलीस दल व निर्माण बहुउद्देशिय विकास संस्थेमार्फत कराड येथील शहर पोलिस ठाण्यात बालस्नेही पोलीस ठाण्याचे शुक्रवारी थाटात उद्घाटन झाले. यावेळी कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी याणू प्रमुख उपस्थिती लावली होती.
यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सुचित्रा काटकर, मा. वैशाली भांडवलकर यांची उपस्थिती होती. यावेळी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये बालस्नेही पोलीस ठाणेचे उदघाटन विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनिल फुलारी यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती वैशाली भांडवलकर यांनी केले. त्यांनी बोलताना बाल स्नेही पोलीस ठाणेचे महत्व पटवुन दिले. त्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये पहिल्या टप्यात अ ग्रेड पोलीस ठाणेस बालस्नेही पोलीस ठाणे हि संकल्पना अमलात आणुन पुढील काही काळात सातारा जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे हे बालस्नेही पोलीस ठाणे बनवू, अशी ग्वाही दिली.
यावेळी महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पोलीस ठाणे आलेल्या सर्व बालक महिला तसेच जेष्ठ नागरीक याना पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी आदराने व आपुलकीने वागणुक दिली पाहिजे. तसेच सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना निर्माण बहुदेशिय संसंस्थेच्यावतीने आपले स्थरावर 03 तासाचे प्रशिक्षण देण्यात यावे असे सांगितले आहे. त्यानंतर कराडचे DYSP श्री. अमोल ठाकुर यांनी सदर कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व नागरिक व निर्माण बहुदेशिय संस्थचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांचे आभार मानले.
बालकांच्या तक्रारींचे निराकरण ‘बालस्नेही’च्या माध्यमातून करणार : अमोल ठाकूर
बालकांना विश्वास देण्याचे काम तसेच त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे काम बालस्नेही पोलीस ठाण्याच्या माध्यमातून केले जाणार आहे. बालकांच्या तक्रारींचे निराकरण, विधी संघर्षित मुलांचे पुनर्वसन तसेच बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाअंतर्गत प्रयत्न करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.