‘महायुतीत गडबड, बरेच नेते…’; भुजबळांच्या पवार भेटीवर बाळासाहेब थोरातांचं खळबळजनक वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीवरून वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. अशातच काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी महायुतीत बरीच गडबड असून अनेक नेते आमच्या संपर्कात यायला सुरूवात झाली असल्याची प्रतिक्रिया कराडमध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे.

पवार भेटीचं दुसरंही कारण असू शकतं

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोमवारी कराडमध्ये झालं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आ. बाळासाहेब थोरात म्हणाले की, शरद पवारांच्या भेटीबद्दलचं कारण भुजबळांनी सांगितलं असेल तर आनंदाची गोष्ट आहे. परंतु, दुसरंही कारण असू शकत, अशी गुगलीही त्यांनी टाकली आहे.

क्रॉस वोटिंग करणाऱ्यांची फडणवीस – अजितदादांसोबत बैठक?

विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांची फडणवीस आणि अजितदादासोबत बैठक झाली होती, या मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर आ. बाळासाहेब थोरात म्हणाले, ते आम्हाला माहीत नाही. परंतु, काही लोकांनी क्रॉस वोटिंग केलं असून त्याबाबतची विश्वसनीय माहिती आमच्याकडे आली आहे. त्याबद्दलचा अहवाल आम्ही दिल्लीला पाठवला आहे. संबंधितांबद्दलचा निर्णय योग्य वेळी होईल.

…तर जयंत पाटील विजयी झाले असते

मराठा-ओबीसी संघर्षावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, छगन भुजबळांचं शरद पवारांशी काय बोलणं झालं, पवारांनी त्यांना काय सांगितलं, हे आपल्याला माहिती नाही. परंतु, राज्यात निर्माण झालेला जातीय संघर्ष थांबवायचे प्रयत्न झाले पाहिजेत. असे प्रश्न रस्त्यावर उतरून सुटत नाहीत. विधान परिषद निवडणुकीत आमच्याकडे जेमतेम मतं होती. आमचे मित्र पक्ष आणि जयंत पाटील यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातील लोकांची मते मिळाली तर जयंत पाटलांचा विजय होईल, अशी अपेक्षा होती, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.