कराड प्रतिनिधी । विधानसभेत आमचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावे. तशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे करणार आहे. ही परिस्थिती का आली? 1 वर्षात दोनदा पक्ष फोडणं आजपर्यंत कधी झालेले नाही. राज्याच्या राजकारणात अशी गोंधळाची परिस्थिती कधीही पाहिली नाही. राज्याला एक मुख्यमंत्री असून दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक पूर्वीचे मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री झाले आहेत तर सध्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे एका म्यानात दोन तलवारी कशा काय राहणार? म्यानात आता तीन तलवारी घालण्याचे काम राज्यात सुरू आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी कॉंग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
माजी सहकारमंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आ. बाळासाहेब थोरात कराड येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, कोयना दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, संचालक, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आ. थोरात म्हणाले, राजकारण बदलते, काही बदल होतात. मात्र, एका वर्षात दोन पक्ष फोडणे, लोक बरोबर घेणे असे कधीही राज्याच्या राजकारणात घडलेले नाही. भाजपने सत्तेसाठी काहीही हे ध्येय वाक्य घेऊन सरकार बनवले आहे. सरकार बनवल्यानंतरही खातेवाटप व्यवस्थित होत नाही. नवीन मंत्रिमंडळ वाढीची आमदार वाट पाहात आहेत. त्यातून संघर्षाचे वातावरण आमदारांत असून, नाराजीचा सूर असल्याचे दिसत आहेत.
विरोधीपक्षनेते पदाबाबत बाळासाहेब थोरात यांचं मोठं विधान; म्हणाले की, pic.twitter.com/6nHZjN1rCZ
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 16, 2023
आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही… नाही… नाही… म्हणणारे अखेर त्यांच्यासोबतच गेले. फडणवीस जे बोलतात त्यांच्या उलट वागत आले आहेत. राज्यात सगळीकडे भष्टाचार चालला आहे. जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून जनतेत प्रचंड नाराजी आहे. आमदारांमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. त्यामुळे राज्यात असे सरकार नको. त्यापेक्षा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी यावेळी थोरात यांनी केली.
आमचा एकही आमदार फुटणार नाही : थोरात
काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नसून उलट विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला एकजुटीने सामोरे जाऊ. राज्यात 15 जुलै आला तरीही अद्याप पावसाअभावी पेरण्या झालेल्या नाहीत. जेथे पेरण्या झाल्या आहेत त्याला पाणी नसल्याने पिके वाया जाऊन दुबार पेरणीची संकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत हवालदिल परिस्थिती निर्माण झाली असल्याचे थोरात यांनी म्हंटले.