सातारा प्रतिनिधी | राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी, सातत्यपूर्ण आरोग्य गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरिक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात ३१ आपला दवाखाना मंजूर असून २१ प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात आले आहेत. १० ची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.
आपला दवाखान्यामध्ये महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाहय यंत्रणेव्दारे मोफत रक्त तपासणी, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भसेवा, इ. आरोग्यसेवा पुरविण्यात येत आहेत. जिल्हा नियोजन समिती बैठकीत आपला दवाखाना कामकाजाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याबाबत आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार जिल्हयातील आपला दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळेमध्ये बदल करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाइ यांनी दिल्या आहेत. त्यानुसार सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते सायंकाळी ८ अशी वेळ निश्चित करण्यात आली असून दि. १ जानेवारी पासून याप्रमाणे कामकाज करण्यात येत आहे, अशी माहिती ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.
हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना लाभार्थीच्या वेळेनुसार कार्यरत करण्यात आले आहेत. केंद्र शासनाकडून 15 वा वित्त आयोग अंतर्गंत आरोग्य विषयक योजनांसाठी तसेच ग्रामीण व शहरी भागांतील विविध प्राथमिक आरोग्य संस्थांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागांपासून तसेच झोपडपट्टी वस्तीपासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अंतर जास्त असणे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे काही झोपडपट्टया व झोपडपट्टी सदृश भाग आरोग्य सेवांपासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आले होते. ;या पार्श्वभूमीवर राज्यात हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाची स्थापना करण्यात आली आहे.