सातारा प्रतिनिधी । मागील वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीबरोबर गेले. त्यावेळी राष्ट्रवादीकडे जिल्हाध्यक्षच नव्हता. दोन महिन्यांनंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक – निंबाळकर यांची नियुक्ती झाली. पण, वर्षभरातच जिल्हाध्यक्षांनी काडीमोड घेतला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला गेली दहा दिवसांपासून नवीन जिल्हाध्यक्ष नव्हता. मात्र, अजितदादांनी आता नवीन दुसरा जिल्हाध्यक्ष शोधला असून बाळासाहेब सोळसकर यांच्या नावावर त्यांनी आज शिक्कामोर्तब केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार हे महायुतीबरोबर गेले. त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्रीपदही मिळाले. त्यानंतर सातारा जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. मागील वर्षभर ते जिल्हाध्यक्षपदी होते. पण, १० दिवसांपूर्वीच फलटणचे आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीचा नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागले होते.
आज बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव तालुक्यातील बाळासाहेब सोळसकर यांची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोळस्कर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होते.