पाटण प्रतिनिधी | राज्यात 1250 मेट्रिक टन गाळप क्षमता असणार्या अनेक कारखान्यांच्या बरोबरीने दर देत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना राज्यात अग्रेसर ठरला असल्याचा दावा पालकमंत्री तथा कारखान्याचे मार्गदर्शक शंभूराज देसाई यांनी केला. तसेच राज्यातील सरकार हे साखर कारखानदारीच्या पाठीशी असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
दौलतनगर (ता. पाटण) येथे लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याची 53 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, आदित्यराज देसाई, जयराज देसाई, डॉ. दिलीपराव चव्हाण, अशोकराव पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग नलवडे, मिलिंद पाटील, बाबुराव नांगरे उपस्थित होते.
यावेळी शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्र राज्यात अनेक सहकारी साखर कारखाने आहेत. मात्र, 1250 मेट्रिक टनाची गाळप क्षमता असणार्या देसाई कारखान्याने इतर कारखान्यांच्या बरोबरीत शेतकर्यांच्या उसाला दर दिला आहे. चांगला दर देण्यात लोकनेते देसाई कारखाना राज्यात अग्रेसर ठरला असल्याचा दावा देखील पालकमंत्र्यांनी केला आहे.
राज्यातील कारखान्यांचे साडे सात हजार कोटी माफ
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या इन्कम टॅक्सबाबतचा प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती केली. सरकारच्या विनंतीनुसार मोदी सरकारने इन्कम टॅक्सचा प्रश्न तडीस नेला. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांचे साडे सात हजार कोटी रूपये माफ झाले. त्यामध्ये देसाई कारखान्याचे 55 कोटी रुपयांचा समावेश आहे. या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा राज्यातील सर्व साखर कारखान्यांना झाला असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाईंनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.
देसाई कारखान्याची गाळप क्षमता वाढली
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली 1250 मेट्रिक टनाचा हा कारखाना 3 हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा करण्यात आला आहे. तसेच देसाई कारखाना क्षेत्रातील सभासदांची एफआरपीची उर्वरित रक्कम लवकरच शेतकरी सभासदांच्या थेट खात्यांवर जमा केली जाईल, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी वार्षिक सभेत दिली.