कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात शिकारीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. अशीच घटना नुकतीच कराड तालुक्यातील शहापूर येथील सह्याद्री साखर कारखाना हद्दीत घडली. या ठिकाणी डोंगरात एक बहेली सापळा सापडला आहे. स्थानिक शेतकरी धनाजी पाटील यांचा पाळीव कुत्रा हा रानात गेले असता त्याचा पाय शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात अडकला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील शहापूर गावच्या परिसरातील स्थानिक शेतकरी धनाजी पाटील हे आपल्या पाळीव कुत्र्याला सोबत घेऊन रानात गेले होते. त्यांना सोडून कुत्रा काही अंतरावर गेला असता अचानक त्याचा पाय शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात अडकला. कुत्रा सदर सापळा साखळीसह घेऊन लंगडत आपल्या मालकाच्या घरापर्यंत आला.
कुत्रा रस्त्यावरून घराकडे जात असताना योगेश शिंगण यांनी ते पाहिले. त्यांनी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना तत्काळ त्याचे फोटो पाठवले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेचे गांभीर्य ओळखून रोहन भाटे यांनी त्वरीत उपवनसंरक्षक सातारा तसेच वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो यांना सावध केले आहे. त्यांनी तत्काळ याची माहिती घेत सापळा लावणाऱ्याचा शिकाऱ्याचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणाचा अधिक तपास वनक्षेत्रपाल तुषार नवले करीत आहेत.
शिकारीच्या पद्धतीची वैशिष्ट्ये
बहेली ही स्थलांतरित जमात आहे. राजस्थान, हरयाणा,
मध्यप्रदेशात बहेली जमातीचा वावर दिसून येतो. प्रामुख्याने देशाच्या सीमांतर्गत भागांत बहेली जमात राहतात. वाघाची शिकार करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. खेडेगावात राहायला आल्यानंतर लोहार कामापासून छोटीमोठी कामे करत बहेली जमात उपजीविका करते. शिकारीची संधी मिळाल्यास स्थानिक वन्यप्राण्याला फास्यात अडकवून मारुन टाकते. बहेली जमात शिकारीतील मांस खात नाही. वन्य प्राण्याच्या कातडीची विक्री करते. केवळ सहा माणसांच्या बळावर शिकाराची योजना आखली जाते. वन्यप्राणी अडकल्यानंतर प्राण्याला मारण्याचे आणि पाऊण तासाच घटनास्थळावरुन पोबारा करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. एका ठराविक ठिकाणी गटातील प्रमुख माणसे जमल्यानंतर वन्यप्राण्याची कातडी शरीरापासून वेगळी काढली जाते.