सातारा प्रतिनिधी । साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा इंग्रज काळाच्या अगोदरपासून बावधनमध्ये भरते. बावधन गावची बगाड यात्रा ही दरवर्षी फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी भरवली जाते. मात्र, याची तयारी ही जवळ जवळ एक ते दीड महिना अगोदरपासून केली जाते. ‘काशीनाथाचं चांगभलं’च्या गजरात यंदा ३० तारखेला होणार आहे. प्रसिद्ध बगाड यात्रेचा यावर्षीचा बगाड्या होण्याचा मान शेलारवाडी येथील विकास तानाजी नवले यांना मिळाला आहे.
होळी पौर्णिमेच्या दिवशी रात्री १२ वाजता देवाला कौल लाऊन या यात्रेतील बगाड्या होण्याचा मान ठरविला जातो. यावर्षी शेलारवाडी बावधन येथील विकास तानाजी नवले यांना हा मान मिळाला आहे. काळभैरवनाथ यांना नवस केला होता तो पूर्णत्वास गेल्यामुळे नवसपूर्ती करण्यासाठी यावर्षीचा मान नवले यांना मिळाला आहे. बावधन बगाड यात्रेला मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून भाविक हजेरी लावत असतात.
बगाड म्हणजे नेमकं काय?
बगाड म्हणजे नक्की काय?, थोडक्यात सांगायचं झालं तर बगाड म्हणजे बैलांनी ओढला जाणार गाडा. दगडी चाके असलेला रथ. बावधन येथील यात्रेत जे बगाड वापरले जाते त्याचं वजन तब्बल दोन ते तीन टन इतके असते. बगाडाला दगडाची चाके, दगडी चाकावर कणा, मग येतो खांबावर शीड अशी एकंदरीत बगाडाची रचना असते. बगाडाच्या शिडाला म्हणजेच रथाच्या टोकाला टांगलेला नवसाचा बगाड्या असतो. चार दिवस चालणार्या या यात्रेत पहिला दिवस देवाचे लग्न, दुसरा दिवस मांसाहारी जेवणाचा, तिसरा दिवस हा ‘छबिना’ (पारंपरिक खेळ) आणि शेवटचा दिवस बगाडाचा असतो.