सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे रयत आधार सोशल फाउंडेशन व प्रहार जनशक्ती पक्षाचा नुकताच दिव्यांग मेळावा पार पडला. या मेळाव्यातून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चु कडू यांनी “जिसका कोई नही, उसका प्रहार है यारो”असे गौरवोद्गार काढले. मात्र, लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. “शेतकऱ्यांना शेतातील पिकाला चांगला दर भेटला तर लाडकी बहीण करून पंधराशे रुपये देण्याची काय गरज आहे. लेक लाडकी म्हणायचं आणि लाडक्या शेतकऱ्यांना मारायचं का? आमच्या शेतकऱ्यांना भाव द्या, आम्हीच तुम्हाला पंधराशे रुपये देतो ‘तुम्हारी क्या औकाद है”, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
कातरखटाव येथे झालेल्या दिव्यांग मेळाव्यास रयत आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मकरंद बोडके, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. इन्नुस शेख, मंडलाधिकारी हिम्मत बाबर, कातर खटावच्या संरपंच कांचन बागल, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे, खटाव तालुकाध्यक्ष अक्षय ननावरे, प्रमोद तावडे, सुनील तावरे, वैद्यकिय अधिकारी सुशील तुरुकमाने, माजी सरपंच तानाजीशेठ बागल, सुरज कुंभार, वडूज नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बच्चू कडू म्हणाले की, ‘माझ्या दिव्यांग बांधवांना घरापासून ते त्यांच्या रोजच्या पोटापाण्याच्या प्रश्नापर्यंत ही लढाई चालू ठेवणार, कुठेही थांबणार नाही. दिव्यांग कुठल्या अवस्थेत जगतात हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे’ जिसका कोई नहीं होता उसका प्रहार है यारो, अशी म्हण तयार झाली पाहिजे. दिव्यांगांचे पैसे घेऊन अशी परिस्थिती कोण निर्माण करीत असेल तर त्यांना कायद्याने हिसका दाखवा. त्याच्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. आपल्या दिव्यांगांना राहायला घर नाही. जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनची योजना असल्याचे कडू यांनी म्हटले.
अगर कोई गलती करता है, तो ठोक दो…
सगळ्या पक्षांनी राज्य केलं, पण अंधांना अजून घरकुल भेटलं नाही. मग राज्य बदलून केलं तरी काय उपयोग? ही योजना कुणासाठी असली पाहिजे, अधिक कष्टकरी, अडचणीत आहे, त्यांच्यासाठी योजना असली पाहिजे. ज्यांचे पाय, हातही चांगले आहेत. त्यांच्यासाठी नाही. ‘अगर कोई गलती करता है, तो ठोक दो’, अशा थेट इशारा बच्चू कडू यांनी यावेळी प्रशासनास दिला.
दिव्यांग हेच माझे विठ्ठल
आमचा पक्ष हा दिव्यांगासाठी लढतो आहे. दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे. आम्ही कोणत्याही जातीच्या नावाने लढत नाही तर दिव्यांग हीच आमची जात आहे, दिव्यांग हेच माझे विठ्ठल आहेत. ब-याच व्यक्तींना हात नाहीत, पाय नाहीत, डोळे नाहीत, ऐकू येत नाही अशा दिव्यांगांनी जीवन जगताना कोणतीही हार मानली नाही, जगण्याची आशा सोडलेली नाही. अशा दिव्यांगांच्या हाकेला धावणारा आमचा प्रहार पक्ष असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले.