कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील एका गावाने आगामी लोकसभा व विधानसभा मतदान निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. कराड तालुक्यातील बाबरमाची, किल्ले सदाशिवगड येथील बुथ लेव्हल अधिकारी गावात राजकीय हेतूने काम करत आहेत. ठरावीक मतदारांची नावे परस्पर कमी करून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून अशा बिलओवर कारवाई करावी, त्यांनी परस्पर कमी केलेली नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करावी. अन्यथा येणाऱ्या निवडणुकांवर सामुहीक बहिष्कार घालु असा इशारा बाबरमाची ग्रामस्थांनी दिला आहे.
बाबरमाची ग्रामस्थांच्या वतीने त्याबाबतचे निवेदन मतदार नोंदणी अधिकारी तथा कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांना देण्यात आले आहे. यावेळी निवडणुक विभागाचे नायब तहसिलदार युवराज पाटील, सुरेश पाटील, अधिक पाटील, संपतराव पाटील, भास्कर पाटील, अनिल पोळ, माणसिंग मुळीक, प्रविण जाधव, शंकर खोचरे, सचिन कदम, सुरेश खोचरे, राजाराम जगताप, प्रकाश बजुगडे, शुभम माने, अक्षय पाटील, विशाल कुंभार, अजय घोरपडे, रणजीत पाटील, अमोल पाटील, मुकुंद वाघमारे, राजेंद्र वाघमारे, गजानन घोरपडे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, १८ वर्षे पुर्ण झालेल्या प्रत्येक युवा व नागरीकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणुक विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. यासाठी मोठयाप्रमाणात जनजागृती व शिबिरे आयोजीत करण्यात येत आहेत. असे असताना बाबरमाचीतील बिएलओ राजकीय हेतूने काम करत आहेत. गावातील ठरावीक मतदारांची नावे त्यांनी परस्पर कमी करण्यात आली आहेत.
१८ वर्षे पुर्ण झालेल्या नविन मतदार नोंदणीसाठी दिलेली कागदपत्रे गहाळ करूण त्यांची नावे जाणीवपुर्वक मतदार यादीत येऊ दिली नाहीत. त्यामुळे अनेक मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित रहाणार आहेत. त्यामुळे अशा राजकीय हेतूने काम करणाऱ्या बिएलओवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे.