सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची अयोध्या यात्रा रखडली; 741 जेष्ठांना लागली रामलल्लांच्या दर्शनाची आस

0
2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील 741 ज्येष्ठ नागरिक अयोध्येला जाण्यासाठी उत्सुक आहेत, परंतु विधानसभेची आचारसंहिता लागल्याने त्यांची यात्रा रखडली आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये राज्यातील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा करण्याची सुविधा दिली जाते.

या योजनेसाठी सातारा जिल्ह्यातून 1 हजार 129 अर्ज आले होते, ज्यातून 741 लाभार्थ्यांची निवड करून त्यांच्या अयोध्या यात्रेसाठी तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागल्याने ही यात्रा रद्द करावी लागली. आता विधानसभा निवडणूक पूर्ण झाली आहे आणि मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडून यात्रा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना घोषित केली होती, ज्यामध्ये भारतातील 73 आणि महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास, भोजन आणि निवास यासाठी 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च मिळतो. आता शासन स्थापन झाल्याने ज्येष्ठ नागरिकांची देवदर्शनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी यात्रेला मुहूर्त काढावा, अशी मागणी होत आहे.