कराड प्रतिनिधी | रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील य. मो. कृष्णा कारखान्यास पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने सन २०२२-२३ या गळीत हंगामातील “कै. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्ही.एस.आय.) मांजरी-पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप व ‘जयवंत शुगर्स’चे श्री. विनायक भोसले यांच्यासह दोन्ही कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
याप्रसंगी व्ही.एस.आय.चे उपाध्यक्ष तथा सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, आ. जयंत पाटील, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आ. बाळासाहेब पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, आ. विश्वजित कदम, हर्षवर्धन पाटील, इंद्रजित मोहिते, विशाल पाटील, मोहनराव कदम, आ. अरूण लाड, जयप्रकाश दांडेगावकर, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, महासंचालक संभाजी कडू-पाटील, शिवाजीराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात जयवंत आदर्श कृषी योजनेच्या माध्यमातून विविध ऊसविकास संवर्धन योजना व उपक्रम राबविले जातात. या अंतर्गत त्रिस्तरीय ऊस बेणेमळ्याद्वारे ऊस बेणे वाटप, हंगामनिहाय व जातनिहाय लागवड योजना राबविण्यामध्ये सातत्य, ठिबक सिंचन योजनेची प्रभावी अंमलबजावणी, शेतकरी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणे, आधुनिक खोडवा व्यवस्थापन कार्यक्षेत्रात योजनेची प्रभावी अंमलबजावणी, माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळेची स्थापना आणि त्याद्वारे माती व पाणी परिक्षण योजनेवर भर, जीवाणू खत प्रयोगशाळेची स्थापना आणि त्याद्वारे वेगवेगळ्या जीवाणू खताचे उत्पादन आणि वितरण केले जाते.
तसेच जयवंत शुगर्समध्ये उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठी १०० टक्क्यांहून अधिक गाळप क्षमतेचा वापर म्हणजे १४७.७४ टक्के गाळप क्षमतेचा वापर केला गेला आहे. तसेच रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन ९६.३३ टक्के राहिले आहे. विशेष म्हणजे जयवंत शुगर्सने साखर तयार करण्यासाठी फक्त १६ टक्के इतकाच बगॅसचा वापर केला आहे. तसेच साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा वापर ३१.९९ टक्के असून, विजेचा वापर २२.४६ किलोवॅट प्रतिटन ऊस इतका केला आहे. कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगर्सच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत व्ही.एस.आय.ने हे पुरस्कार प्रदान केले आहेत.
याप्रसंगी कृष्णा कारखान्याचे संचालक संजय पाटील, बाजीराव निकम, जे. डी. मोरे, अविनाश खरात, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक राम पाटील, मनोज पाटील, वैभव जाखले यांच्यासह मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, ‘जयवंत शुगर्स’चे जनरल मॅनेजर एन. एम. बंडगर, डेप्युटी जनरल मॅनेजर (टेक्निकल) आर. आर. इजाते, चिफ इंजिनिअर एच. एम. नदाफ, चिफ केमिस्ट बी. जी. चव्हाणके, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, प्रशासकीय अधिकारी आर. टी. सिरसाट आदींची उपस्थिती होती.
‘जयवंत’च्या शेतकऱ्यास ऊसभूषण पुरस्कार
जयवंत शुगर्सचे सुर्ली (ता. कोरेगाव) येथील ऊसउत्पादक शेतकरी सुहास मधुकांत पाटील यांनी प्रति हेक्टरी २९९.२४ मेट्रिक टन ऊस उत्पादन पूर्व हंगामात घेतले आहे. त्यांना दक्षिण विभागातील ऊसभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.