सातारा प्रतिनिधी | सातारा पालिकेतील एका महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असून, या ऑडिओ क्लिपने पालिका वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. ६ मिनिटे ३५ सेकंदांची ही क्लिप असून यातील पैशांच्या देवाण-घेवाणीबाबतचा संवाद चर्चेचा विषय ठरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महिला अधिकाऱ्याविरुद्ध यापूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी केली जात असल्याची लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीवरून महिला अधिकाऱ्याची पालिकेत गोपनीय चौकशी झाली. या चौकशीनंतर मुख्याधिकाऱ्यांकडून त्यांचा पदभार काढून घेण्यात आला. हे प्रकरण ताजे असताना आता त्या अधिकाऱ्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
साडेसहा मिनिटांच्या या क्लिपमध्ये ठेकेदार संबंधित महिला अधिकाऱ्याला ‘किती बिले काढण्यात आली, या बिलांपोटी तुम्हाला किती पैसे द्यायचे, आतापर्यंत किती पैसे दिले’ अशी विचारणा करीत आहे, तर पालिकेच्या सोलर ऊर्जा प्रकल्पाचे काम नियमबाह्य असून, ते मी होऊ देणार नाही, असे महिला अधिकारी ठेकेदाराला सांगत आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराने महिला अधिकाऱ्याविरुद्ध लाचलुचपत विभागाकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आल्याची चर्चा केली जात आहे.